Thu, Aug 22, 2019 03:49होमपेज › Belgaon › भाजप नेते धोत्रेंवर हल्‍ला

भाजप नेते धोत्रेंवर हल्‍ला

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 11:53PMबेळगाव : प्रतिनिधी

भाजपचे महानगर सचिव आणि आगामी निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदारसंघातून इच्छुक असलेले पांडुरंग धोत्रे यांच्यावर रविवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातच हल्ला झाला. हा हल्ला माजी आमदार अभय पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केल्याची तक्रार धोत्रे यांनी टिळकवाडी पोलिसांत केली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती.

हल्ल्यात धोत्रे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धोत्रे यांचा शर्ट, बनियन फाडण्यात आले आहे. याच मतदारसंघातून इच्छुक असलेले महानगर उपाध्यक्ष सुनील चौगुले यांनीही स्वतःला धक्‍काबुक्‍की झाल्याचा आरोप केला आहे. भाग्यनगरमधील रामनाथ मंगल कार्यालयात भाजपच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजिण्यात आला होता. मेळाव्यात हा प्रकार घडला. 

अभय पाटलांकडून प्रथम मारहाणः धोत्रे

मेळाव्याला हजर होण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून आमंत्रण देण्यात आले होते. त्याप्रमाणे मीही मेळाव्याला गेलो होते. पण माजी आमदार अभय पाटील व त्यांचे समर्थक प्रविण पिळणकर, प्रदीप शेट्टी यांच्यासह 60 ते 70 कार्यकर्त्यांनी तुला कार्यक्रमाला कोणी निमंत्रण दिले, तुझे येथे काय काम, असे प्रश्न करत मला रोखून धरले.  

पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी मोबाईलवर आलेला मेसेज मी दाखवला. तरीही  मला मारहाण  करण्यात आली. अभय पाटील यांनी प्रथम मारहाण केली, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आपल्याला जबर मारहाण केली, असा आरोप पांडुरंग धोत्रे यांनी केला आहे. 

हल्ल्याची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर   भाजप कार्यकर्त्यांनी  जिल्हा इस्पितळात आवारात मोठी गर्दी केली.त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मारामारीसंदर्भात टिळकवाडी पोलिसांकडून उशीरापर्यंत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.  काँग्रेसचे विधान परिषद सदस्य एम.डी.लक्ष्मीनारायण यांनी जिल्हा इस्पितळाला भेट देउन धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

वैमनस्याचा आरोप

राजकीय वैमनस्यातून मला अभय पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. विधानसभा उमेदवारीसाठी माझेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे भाजप मेळाव्यात भाग घेण्यापासून रोखण्यासाठी मला मारले. माजी आमदारांकडून पक्षनेत्याला मारहाण होत असेल, तर सामान्य जनतेचे काय, असे धोत्रे म्हणाले. तर मलाही धक्‍काबुक्‍की झाली, असा दावा भाजप महानगर उपाध्यक्ष सुनील चौगुले यांनी केला. या आरोपांबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी अभय पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी मोबाईल कॉल स्वीकारला नाही.