Wed, Apr 24, 2019 15:48होमपेज › Belgaon › एपीएमसीमध्ये भात खरेदी केंद्र कधी ? 

एपीएमसीमध्ये भात खरेदी केंद्र कधी ? 

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 09 2017 10:41PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी 

गेल्या चार वर्षापासून दुष्काळाचा  सामना करावा लागणार्‍या शेतकर्‍यांकडून  पिकांना हमीभाव देण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. धान्यांच्या खरेदीसाठी खरेदी केंद्रे उभारण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत असताना एपीएमसी सदस्यांनी मात्र याकडे  दुर्लक्ष केले आहे.  

शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, दलालांकडून होणारी फसवणूक थांबावी, पिकाला योग्य भाव मिळवा या उद्देशाने राज्यात कृषी उत्पन्न बाजारपेठा उभारण्यात आल्या आहेत. या  बाजारपेठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारच्या प्रतिनिधींसह शेतकर्‍यांनी निवडलेल्या प्रतिनिधींचीही समिती आहे. मात्र या समितीकडून शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. 

सध्या सुगीचा हंगाम संपत आला असून शेतकर्‍यांनी काबाडकष्ट करून उत्पादित केलेल्या धान्याची कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे. याची जाणीव एपीएमसी सदस्यांना असतानादेखील सदस्यांकडून मात्र शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न करण्यात येत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांतून तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. 

यावर्षी बहुतांश शेतकर्‍यांनी बटाटा पिकाकडे पाठ फिरविली असून मका, सोयाबीन, भुईमूग, भात या पिकांवर अधिक भर दिला होता. शेतकर्‍यांना भरघोस उत्पादन मिळाले असले तरी अपेक्षेनुसार भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून हमीभावाची मागणी करण्यात येत आहे.  एपीएमसी आवारात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. याची दखल मात्र कोणत्याही सदस्याने घेतलेली नाही. एकाही एपीएमसी सदस्याने शेतकर्‍यांच्या समस्या जिल्हा प्रशासनासमारे मांडण्यासाठी पुढाकार घेतला  नसल्याने तालुक्यातील  शेतकरी नेत्यांतून एपीएमसी सदस्यांचा निषेध करण्यात येत आहे.