Sat, May 25, 2019 22:59होमपेज › Belgaon › वाढले अर्थकारण, बिघडले समाजकारण

वाढले अर्थकारण, बिघडले समाजकारण

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 11:05PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अर्थकारणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक असणारा पैसा जोरात चर्चेत असून उमेदवारांनी मतदारांना किती पैसा वाटला असेल, याचाच अंदाज आता बांधला जात आहे. काही मतदारसंघात मताला 500 रुपये तर काही मतदारसंघात मताला 1000 रुपये वाटण्यात आले.

निवडणुकीचा निकाल फिरवण्याची ताकत पैशामध्ये असल्याचे मतदानाच्या निकालातून दिसून आले.  त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून सामान्य नेते तर जणू हद्दपार झाले आहेत.जिल्ह्याच्या 18 विधानसभा निवडणुकांमध्ये 203  उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी बहुतांश नेत्यांची मालमता कोटीच्या घरात असल्याचे दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये उधळण्यात आले.  मतदारांना अनेक वस्तू, रोख रक्‍कम यांचे आमिष दाखविण्यात आले. यामुळे स्वाभिमान गहाण टाकून जनतेनेदेखील अशा नेत्यांना साथ दिली.

इच्छुकांनी मागील दोन वर्षापासून जनतेवर अमाप पैसा खर्चण्यास प्रांरभ केला होता. लाखो रुपयाच्या शर्यती घेण्यात आल्या. कार्यकर्त्यांना टी शर्ट, महिलांना साड्या आणि नेत्यांना रोख रक्‍कम यांचा ओघ कायम ठेवावा लागला. यातून मतदार सांभाळण्याचे काम उमेदवारांनी केले.

म. ए. समितीचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्यात या अर्थकारणांनी फार मोठी भूमिका बजावल्याचा आरोप कार्यकर्त्यांतून केला जात आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवाराच्या नेत्यांनाच योग्य प्रकारे मॅनेज केल्याची माहिती उघडकीस आली. परिणामी स्वाभिमानाच्या आणि विचाराच्या लढाईत पैसा अधिक सरस ठरला आहे.

उमेदवारांनी मतदारांना खरेदी करण्यासाठी शंभर रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत पैशांचे वाटप केले. यातून फोडाफोडीचे राजकारण झाले. गावागावातून वारेमाप पैसा पुरविला. परिणामी उमेदवारांची मताची गणिते विस्कटली. असा प्रकार मराठी भागात अधिक प्रमाणात झाला. विशेष म्हणजे आज स्वाभिमान जपणार्‍या मराठी मतदारांनी स्वाभिमान गुंडाळून पैशाच्या मोहापायी अस्मितेला मूठमाती दिली. यामुळे यापुढे केवळ तत्त्व अथवा विचारांची लढाई पैशाविना लढणे अवघड बाब बनणार आहे.