Sat, Jul 20, 2019 15:34होमपेज › Belgaon › हुक्केरीत कत्तींची प्रतिष्ठा की एबींचे अस्तित्त्व?

हुक्केरीत कत्तींची प्रतिष्ठा की एबींचे अस्तित्त्व?

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 08 2018 11:13PMबेळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील कृषिप्रधान तालुका अशी ओळख असलेला हुक्केरी तालुक्यावर भाजपचे वर्चस्व आहे, हे नवे नाही.  पण कर्नाटकात काँग्रेसला पुन्हा पोषक स्थिती आहे. त्यामुळेच हुक्केरी मतदारसंघात यंदा पुन्हा उमेश कत्तींची प्रतीष्ठा पणास लागणार की माजी मंत्री ए. बी. पाटील अस्तित्त्व दाखवणार हा प्रश्न आहे. त्यातच निजदकडून तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे अपक्ष काय करणार, याकडे दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे लक्ष आहे.  उमेश कत्ती बेळगाव उत्तर मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा होते आहे, हेही महत्त्वाचे आहे.

हुक्केरी मतदारसंघ आणि भाजप हे जणू समीकरणच बनले आहे. त्याचे कारण म्हणजे उमेश कत्ती. आ. कत्ती यांनी गेल्या सलग 7 विधानसभा निवडणुकांत विजय संपादन करत मतदारसंघावर आपले  वर्चस्व कायम ठेवले आहे. 

आ.कत्ती यांचे वडील विश्वनाथ कत्ती हे आमदार होते. त्यांच्या काळात  संकेश्वर हा मतदारसंघ अस्तित्वात होता.  त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीत उमेश कत्ती यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर मतदारसंघातील परिस्थितीचा अंदाज घेत उमेश यांनी पक्षबदलू धोरण अवलंबिले. जनता दलातून काँग्रेस, काँग्रेसमधून भाजप असा त्यांचा प्रवास आहे.  त्यात काहीवेळा त्यांना पराभवाची झळही सोसावी लागली. ए.बी.पाटील, शशिकांत नाईक या नेत्यांनी त्यांना प्रत्येकी एकदा पराभूत केले. एकदा काँग्रेसतर्फे तर एकदा भाजपतर्फे  निवडणूक लढविताना कत्तींना पराभवाला सामोरे जावे लागले.

हिरण्यकेशी साखर कारखाना, हुक्केरी ग्रामीण विद्युत संघ, तालुक्यातील सहकारी संघ, संकेश्वर व  हुक्केरी नगरपरिषद, तालुक्यातील ग्राम पंचायतींवर कत्ती गटाचे वर्चस्व आहे. याशिवाय उमेश कत्ती यांचे बंधू रमेश हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, कत्ती कुटुंबातील पवन हे नागरमुन्नोळी व निखिल हे अम्मणगी जि.पं.मतदारसंघाचे सदस्य आहेत. 

ए.बी. पाटील यांच्याकडे कोणतीही सत्ता नसली तरी मतदारसंघातील विशेषत: संकेश्वर भागातील जनता त्यांचा आदर करते. हिडकल योजना संकेश्वर शहरात आणण्यात ए.बी.यांचा सिंहाचा वाटा आहे. याशिवाय संकेश्वरात न्यायालय, अग्नीशामक दल, कोषागार कार्यालय (ट्रेझरी ऑफीस) हे त्यांच्या प्रयत्नातूनच सुरू झाले. संकेश्वर सरकारी इस्पितळाचा दर्जा वाढविण्यात, संकेश्वर परिसरातील ग्रामीण भागाचे रस्ते सुधारणे ही कामे ए.बीं.च्या प्रयत्नातून पूर्णत्वास आली आहेत. हुक्केरी मतदारसंघातूननिधर्मी जनता दलाचा उमेदवार अद्याप निश्‍चित झालेला नाही. स्वाभिमानी संघाच्या माध्यमातून कणगला येथील अनिलकुमार हिरेमठ नामक तरुणाने गेल्या चार वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य चालविले आहे. विद्यार्थी, शेतकरीवर्गांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत कार्य चालविले आहे. हिरेमठ हे यंदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून  रिंगणात उभे राहण्याची तयारी केली असून त्यानी प्रचारही जोमाने चालविला आहे. त्यामुळे हुक्केरी मतदारसंघात भाजप, काँग्रेस व अपक्ष अशी तिरंंगी लढत असणार हे सध्याच्या परिस्थितीवरून म्हणता येईल.

उमेश कत्तींना आपले पुत्र निखिल यांनाही राज्याच्या राजकारणात आणायचे आहे. त्यामुळेच हुक्केरी मतदारसंघातून निखिल यांच्यासाठी आणि बेळगाव उत्तरमधून स्वतःसाठी कत्ती यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ती मान्य होईल का हे दोन दिवसांतच कळेल. मात्र, ए. बी. पाटील काँग्रेसकडून लढणार असतील तर नवखा उमेदवार देण्याची चूक भाजप करणार नाही, हे स्पष्ट आहे.

Tags : belgaum, Assembly Election, Umesh Katti, against, Former Minister A. B. Patil,