Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Belgaon › अशोक चव्हाण यांना सीमाभागात विरोध

अशोक चव्हाण यांना सीमाभागात विरोध

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 05 2018 12:00AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सीमाभागातील मराठी माणसांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बेनकनहळ्ळी येथे सभेपूर्वी म. ए. समिती युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अशोक चव्हाण ...चले जाव अशा घोषणा दिल्या.

काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण यांच्या सभेचे बेनकनहळ्ळी येथे आयोजन करण्यात आले होते. चव्हाण यांनी सभेमध्ये सहभागी होवू नये, यासाठी म. ए. समितीकडून प्रयत्न करण्यात आल होतेे. तरीही चव्हाण सभेसाठी आल्याने बेनकनहळ्ळी येथे म. ए. समितीचे कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेवून उपस्थित होते.

काळ्या झेंड्याची कुणकुण पोलिसांना लागताच त्यांनी युवकांकडील काळे झेंडे ताब्यात घेतले. तरीही कार्यकर्ते रस्त्यावर थांबून होते. अशोक चव्हाणांचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाबरोबरच अशोक चव्हाण यांना चले जाव अशा घोषणा दिल्या. त्यामुळे चव्हाण यांनी शिवपुतळ्याचे पूजन करण्याचा कार्यक्रम रद्द केला. 
चव्हाण यांच्यासोबत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख सभेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी होणार होते. मात्र सीमावासियांचा रोष ओढवू नये यासाठी त्यांनी सभेपासून दूर राहणे पसंद केले.