Wed, Apr 24, 2019 15:42होमपेज › Belgaon › प्रचार चढता, बंडखोरांना विरोध वाढता

प्रचार चढता, बंडखोरांना विरोध वाढता

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 08 2018 8:44PMबेळगाव : प्रतिनिधी

बंडखोर उमेदवारांना सीमाभागात विरोध वाढला आहे.  मराठी भाषिक मतदारातून बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी दबाव आणण्यात येत आहे. यासाठी त्यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात येत असून ठिकठिकाणी विरोध होत आहे.मध्यवर्ती म. ए. समिती अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल करून प्रचार चालविला आहे. यामुळे मराठी मतांच्या विभागणीचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे आजपर्यंत संयम पाळलेल्या मतदारांकडून उमेदवारांना प्रचार करण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

निवडणुकीला केवळ चार दिवस शिल्लक आहेत. या काळात प्रत्येक मतदारसंघातील बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेवून मध्यवर्ती म. ए. समितीने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा अशी मागणी होत आहे. यासाठी शहरातील काही मराठी संघटनांनी प्रयत्न केले. मात्र बंडखोरांच्या म्होरक्यांने घेतलेल्या आडमुठ्या धोरणामुळे एकी रेंगाळली आहे. सध्या ग्रामीण मतदारसंघात मोहन बेळगुंदकर, दक्षिण मतदारसंघात किरण सायनाक व खानापुरात विलास बेळगावकर यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. यामुळे मराठी भाषिक संतप्त बनले आहेत.

याची पहिली झलक शहापूर येथील कोरेगल्लीत दाखविण्यात आली. नागरिकांनी किरण सायनाक आणि त्याच्या म्होरक्याना प्रवेश करण्यापासून रोखले. प्रचार करण्यास अडवणूक केली.त्यानंतर मजगाव येथील मतदारांनीही त्यांना रोखून जाब विचारला. ग्रामीणचे बंडखोर उमेदवार  मोहन बेळगुंदकर यांना बस्तवाड, बहाद्दरवाडी, कर्ले येथे विरोध करण्यात आला. मुतगा येथे त्यांच्या अंगावर पाणी ओतून त्यांची गावातून हकालपट्टी केली. ग्रामस्थांनी त्यांना माघार घेण्याची मागणी केली.त्याचबरोबर उत्तर मतदारसंघातील बाळासाहेब काकतकर यांना शिवाजीनगर, चव्हाटगल्ली परिसरात रोखण्यात आले. अडचणीवेळी गायब असणार्‍या नेत्यांना गल्लीत प्रवेश देण्यात येणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. यातून बंडखोराविषययी मतदारामध्ये धूमसत असणारा असंतोष प्रकट होत आहे. मराठी हितासाठी माघार घेण्याची मागणी जोर धरत आहे.