Mon, Aug 19, 2019 10:03होमपेज › Belgaon › माध्यान्ह आहार कर्मचार्‍यांची मनमानी!

माध्यान्ह आहार कर्मचार्‍यांची मनमानी!

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 21 2018 9:55PMबेळगुंदी : वार्ताहर

मध्यान्ह आहार योजनेत काम करणार्‍या महिलांची मनमानी सुरू असून कामावर नसतानाही पूर्ण पगार मिळत असल्याने महिन्यातून 8 ते 15 दिवस दांडी मारण्यात येत असल्याने मध्यान्ह आहारावर याचा परिणाम होत आहे. शिक्षणाधिकार्‍यांनी अशा कामचुकार कर्मचार्‍यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

राज्य सरकारने मध्यान्ह आहार योजनेंतर्गत सर्व सरकारी शाळांमध्ये दुपारचे जेवण चालू केले.  विद्यार्थ्यांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. मात्र स्वयंपाकासाठी नेमलेल्या महिलांना कामावर न येतासुध्दा संपूर्ण पगार मिळत असल्याने अनेक पहिल्या महिन्यातून 8 ते 15 दिवस गैरहजर रहात आहेत. परिणामी हजर असलेल्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

बेळगुंदी आमदार आदर्श शाळेत 250 विद्यार्थी असून स्वयंपाकासाठी चार महिला होत्या. त्यापैकी एक महिला सोडून गेल्याने तीनच महिला कार्यरत आहेत. त्यापैकी दोन महिला सतत गैरहजर राहतात त्यामुळे चौघींचे काम एकाच महिलेला करावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून दोन महिला गैरहजर आहेत. शाळेला भेट देऊन चौकशी केली असता या महिला सतत असेच करतात. सूचना देवूनसुध्दा सूचनेचे पालन करीत नाहीत.  त्या गैरहजर राहिल्याचे पत्रक वरिष्ठांना दिले तरी ते स्वीकारले जात नाही. त्यांचा पगार पूर्णच काढला जातो, अशी माहिती मुख्याध्यापिका एस. पी. गोळे यांनी दिली.

याबाबत गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

याला जबाबदार कोण?

मध्यान्ह आहार योजनेची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. मात्र, कोणी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा कोणताच अधिकार आम्हाला नाही, असे मत बेळगुंदी भागातील सर्वच मुख्याध्यापकांनी व्यक्‍त केले. जर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना नाही तर याला जबाबदार कोण, असा सवाल करण्यात येत आहे.