Wed, May 22, 2019 10:35होमपेज › Belgaon › अप्पूगोळच्या बंगल्यावर मोर्चा

अप्पूगोळच्या बंगल्यावर मोर्चा

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: Jun 01 2018 12:15AMबेळगाव : प्रतिनिधी

वर्षभरापासून प्रयत्न करूनही ठेवी परत मिळण्याची चिन्हे नसल्याने गुरुवारी संतप्त ठेवीदारांनी संगोळी रायण्णा सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ यांच्या हनुमाननगर येथील बंगल्यावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. शेकडोच्या संख्येने असणार्‍या ठेवीदारांनी घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. 

संगोळ्ळी रायण्णा सोसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याने सोसायटीच्या सर्व शाखा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तर काहीजणांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली आहे. लाखो रुपये गुंतविलेले ठेवीदार कंगाल झाले आहेत. 

या प्रकरणात अटक करण्यात आलेले सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पूगोळ जामिनावर सुटले आहेत.  ही बातमी समजल्यानंतर ठेवीदारांनी अप्पुगोळ यांच्या हनुमाननगर येथील बंगल्यावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. बंगल्याच्या बाहेर जमलेल्या शेकडो ठेवीदारांनी अप्पुगोळ यांच्या नावाने घोषणाबाजी करून ठेवी परत मिळविण्याची मागणी केली. 

मोर्चाची माहिती पोलिसांना समजताच उपायुक्त सीमा लाटकर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जमलेल्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ठेवीदारांनी त्यांची कोणतीच गोष्ट मान्य केली नाही. अखेर आनंद अप्पुगोळ यांना घरातून बाहेर यावे लागले. त्यांनी ठेवीदारांच्या सर्व ठेवी लवकरच परत करण्याचे आश्‍वासन दिले. पण आंदोलक विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिस, ठेवीदारांचे काही प्रतिनिधी आणि अप्पूगोळ यांच्यात चर्चा होऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या चर्चेनंतर ठेवीदारांनी आंदोलन मागे घेतले. 

त्यानंतर आनंद अप्पुगोळ व ठेवीदारांचे प्रतिनिधी यांची पोलिस आयुक्तालय परिसरात बैठक घेण्यात आली. आपल्या असलेल्या मालमत्ता विकून ठेवीदारांच्या ठेवी परत करु, पण  न्यायालयाने मालमत्ता विकण्यास निबर्ंध घातल्यामुळे अडचण असल्याचे अप्पूगोळ यांनी सांगितले. तसेच न्यायालयाने मान्यता दिल्यास मालमत्ता विकून ठेवी परत करू, असेेही ते म्हणाले. 

250 कोटींचा घोटाळा

आनंद अप्पुगोळ यांनी आपल्या सोसायटीच्या माध्यमातून जवळपास 250 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. अप्पूगोळ यांच्या मालमत्तांची विक्री करून ठेवी परत द्याव्यात, अशी मागणी ठेवीदारांनी केली होती. मात्र त्यामध्ये  अनेक कायदेशीर बाबींची अडचण येत असल्याने मालमत्ता विकणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेक मालमत्ता त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असल्याने विकणे अशक्य ठरत आहे.