Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Belgaon › महापालिकेला प्रतीक्षा नव्या आयुक्‍तांची

महापालिकेला प्रतीक्षा नव्या आयुक्‍तांची

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 9:00PMबेळगाव : प्रतिनिधी 

मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांची कर्नाटक सरकारने बागलकोटचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या बदलीचा आदेश बजावलेला आहे. त्यांच्या या बदलीमुळे केवळ बेळगाव मनपाच नव्हे, तर स्मार्टसिटी योजनादेखील सीईओ विना निराधार बनली आहे. ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत व पिण्याच्या पाण्यासह बेळगाव शहरामध्ये विविध समस्या भेडसावत असतानाच त्यांची येथून बदली झाल्यामुळे व त्यांच्या जागेवर कोण अधिकारी येणार? त्या संबंधी सध्या तरी कोणतीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे बेळगाव मनपा कारभाराचा गाडा आयुक्ताविना कसा चालणार? असा प्रश्‍न महापौर, उपमहापौर व नगरसेवकांसमोर उभा राहिलेला आहे. 

मनपा आयुक्तपदी कोणत्या अधिकार्‍याची सरकारने नियुक्ती करावी याची शिफारस करण्याचा अधिकार महापौरांना आहे. या पदासाठी दोन किंवा तीन अधिकार्‍यांची शिफारस महापौर करू शकतात. त्यानुसार त्याप्रमाणे महापौर बसाप्पा चिक्कलदिनी यांनी एका अभ्यासू व ज्येष्ठ अधिकार्‍याची बेळगाव मनपाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

बेळगाव महानगरपालिका राज्यातील एक प्रमुख महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. इतक्या मोठ्या महानगरपालिकेचा दैनंदिन कारभार आयुक्ताविना कसा चालणार? असा प्रश्‍न नगरसेवकांप्रमाणेच शहरातील जनतेसमोरही उभा राहिलेला आहे. त्यासाठी सरकारने ज्यावेळी मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांच्या बदलीचा आदेश बजाविला त्याच दिवशी त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती करावयाची हे सरकारने स्पष्ट करण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने ते स्पष्ट केले नसल्याने आयुक्तपदी कोण येणार? हा प्रश्न आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्या गडबडीमध्ये सारा अधिकारी वर्ग गुंतलेला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बेळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले व मूळ बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अधिकार्‍यांना येथे काम करता येत नाही. त्याकरिता सरकारने त्यांची बदली जिल्ह्याबाहेर केलेली आहे. 

स्मार्ट सिटीचे काय?

बदली झालेले मनपा आयुक्त शशिधर कुरेर हे बेळगाव स्मार्टसिटी योजनेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या बदलीमुळे ते आता प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावू शकत नाहीत. त्यामुळे बेळगाव स्मार्ट सिटी योजनादेखील मुख्य कार्यकारी अभावी निराधार बनली आहे. यासाठी कर्नाटक सरकारने मनपा आयुक्त पदासाठी व स्वतंत्ररित्या स्मार्टसिटी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी तातडीने दोन ज्येष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती करावी,  अशी मागणी होत आहे.