Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Belgaon › मतदानयंत्रे सदोष प्रकरण; १९ समित्यांची नेमणूक

मतदानयंत्रे सदोष प्रकरण; १९ समित्यांची नेमणूक

Published On: Mar 24 2018 1:47AM | Last Updated: Mar 22 2018 10:29PMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी सतर्क झाले असून त्यांच्याकडून मतदान प्रक्रियेची युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. मतयंत्राची तपासणी जोमाने सुरू असून काही मतदान यंत्रे नादुरुस्त असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 19 समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

निवडणुका येत्या दोन महिन्यात होणार आहेत. यासाठी आवश्यक तयारीने गती घेतली आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक मतयंत्रे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवण्यात आली आहेत. त्यांची तपासणी 4 मार्चपासून सुरू असून यामध्ये कर्मचारी व्यग्र आहेत. काही मतदान यंत्रे नादुरुस्त आढळली आहेत. यामुळे खबरदारी घेण्यात येत असून दुरुस्तीकाम सुरू आहे. 15 मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यात 40 कंट्रोल युनिट, 59 बॅलेट युनिट, आणि 208 व्हीव्हीपॅट यंत्रे नादुरुस्त आढळली आहेत. 70 टक्के मतदानयंत्रांची तपासणी झाली असून अद्याप 30 टक्के यंत्राची तपासणी झालेली नाही. यामध्ये नादुरुस्त यंत्रांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या कार्यकत्यार्ंच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची तपासणी करून करण्यात येणार आहे. यामुळे प्रथम अधिकार्‍यांकडून यंत्रांची तपासणी अधिक सतर्कतेने करण्यात येत आहे. यंत्रे नादुरुस्त आढळल्यास मतदान प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीची तयारी वेगात आहे. यामध्ये अधिकारी गर्क असून  निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेची प्रतीक्षा ते करत आहेत. 

अधिकार्‍यांना प्रशिक्षण

निवडणूक प्रक्रियेसाठी जबाबदारींची विभागणी केली आहे. यासाठी वेगवेगळ्या अधिकार्‍यांची नेमणूक केली असून वेगवेगळ्या 19 कमिटी नेमण्यात आल्या आहेत. निवडणूक अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग करणार्‍यांवर कारवाईसाठी भरारी पथक, व्हिडिओ चित्रीकरण यासारख्या कमिटी स्थापल्या आहेत.

यंत्राची कमतरता

जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी 5,510 कंट्रोल युनिट, 6,612 बॅलेट युनिट आणि 6,171 व्हीव्हीपॅट यंत्राची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. यामध्ये बॅलेट आणि कंट्रोल युनिट मागणीपेक्षा अधिक उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून 5,996 कंट्रोल युनिट आणि गुजरात आणि विजापूर येथून 6,679 बॅलेट युनिट आली आहेत. मात्र 447 व्हीव्हीपॅट युनिटची कमतरता आहे. सध्या 5,694 व्हीव्हीपॅट युनिट उपलब्ध आहेत.

मतदानयंत्रे हॅक करणे अशक्य

मतदानयंत्राची तपासणी सुरू आहे. निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचा वापर होणार असून नादुरुस्त यंत्रे बीइएल कंपनीला पाठविण्यात येतात. त्यांच्याकडून दुसरी मतयंत्रे पुरविली जातात. त्यांची अधिकार्‍याकडून तपासणी केली जाते. मतदान केंद्रामध्ये वायफाय, ब्लूटूथ ला प्रतिबंध केलेला असतो. त्यामुळे मतदानयंत्रे हॅक करणे अशक्य असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.