होमपेज › Belgaon › दोन अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची नियुक्‍ती

दोन अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची नियुक्‍ती

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:35PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

दंगलीचे गालबोट लागलेल्या बेळगावसाठी राज्य सरकारने दोघा अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची नियुक्‍ती करून बेळगावकराना आयजीपी पदासाठी अलोककुमार यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर आयुक्‍तपदासाठी डॉ.डी. एस. राजप्पा या ‘कवी मनाच्या’ अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍त म्हणून डॉ. डी. एस. राजप्पा यांनी अलिकडेच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. आयजीपी अलोककुमार दि. 8 रोजी अधिकारपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. 

अलोककुमार 1994 बॅचचे असून कला व व्यवस्थापनाची पोस्ट गॅ्रज्युएट पदवी घेतली आहे. त्यांनी यापूर्वी बंगळूर राजधानी व उत्तर पूर्व विभागाचे आयजीपी म्हणून काम केले आहे. कडक शिस्तीचे कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी गुलबर्गा विभागातील जनतेचे मन जिंकले होते. डी. एस. राजाप्पा हे 2003 बॅचचे असून त्यांनी यापूर्वी विजापूर व बेळ्ळारी येथे काम केले आहे. त्यांना कन्नड साहित्य लेखनाचा छंद आहे. बेळगावची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्‍त डी.एस. राजाप्पा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी केले. 

अलोककुमार हे मूळचे बिहारचे आहेत. हिंदी भाषिक आहेत. कडक शिस्त असली तरी मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात. कोणीही त्याना दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास त्याना ते योग्य प्रतिसाद देतात. त्यामुळे पोलिस-नागरिक यांच्यामधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. 

बेळगावला येण्यापूर्वी त्यांनी उत्तर पूर्व विभागाचे आयजीपी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. उत्तरपूर्व विभागात गुलबर्गा, बिदर व यादगीर हे तीन मागास जिल्हा येतात. त्यांनी आपल्या 2016 च्या कारकिर्दीत वाढत्या गुन्हेगारीचा आलेख रोखला होता. विशेष म्हणजे उत्तर कर्नाटकातील बनावट पिस्तुलांची विक्री रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. यामुळेच एकूणच कर्नाटकातील मागास विभाग म्हणून ओळखला गेलेल्या उत्तर पूर्व भागातील गुन्हेगारी कमी करण्यात आपण यशस्वी ठरलो असल्याचा  दावा आयजीपी अलोककुमार यांनी केला आहे.

संपूर्ण कर्नाटकाचा विचार करता हा भाग हैद्राबाद-कर्नाटक मागास वर्गवारीत मोडतो. तेथे उद्योगधंदे नसल्याने कोणत्याच रोजगाराच्या संधी नाहीत. शेती नाही, पडीक जमीन त्यामुळे बेरोजगारी, सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे दुर्भीक्ष्य त्यामुळे गुन्हेगारीकडे कल. अशा या विभागाला काम करून आपण एक कार्यक्षम अधिकारी असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे.