Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Belgaon › जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपदाचा प्रस्ताव 

जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपदाचा प्रस्ताव 

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 11:04PMबेळगाव : प्रतिनिधी 

राज्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगावसाठी आणखी एक मंत्रिपद देण्यात यावे. यासाठी पक्षाच्या हायकमांडकडे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, असे नगरविकासमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकसभेच्या व्याप्तीनुसार मंत्रिपद देण्यासंदर्भात कोणतीही शक्यता नाही. मात्र, जिल्ह्यासाठी आणखी एक मंत्रिपद देण्यात यावे, यासाठी प्रस्ताव देण्यात आला असून सदर पद कोणाला द्यावे, हा हायकमांडवर सोपवलेला विषय आहे, असेही त्यांनी सांगितले. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील 18 पैकी 8 मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला आहे. सदर निवडणुकांमध्ये किमान 12  जागांवर उमेदवार विजयी न झाल्यास राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र आपण सूचित केलेल्या समर्थक उमेदवारांना तिकीट देण्याची मागणी हायकमांडकडे केली होती. पण इतरांनाच तिकीट देण्यात आल्याने अथणी आणि कागवाड मतदारसंघात उमेदवारांना विजयी केल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून कौतुक करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत सहा जागांवर विजय मिळाला होता. मात्र ताज्या निवडणुकांमध्ये 8 जागांवर विजय मिळाला आहे. 

रायबाग, कुडची, सौंदत्ती मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना सहज विजयी होण्याची संधी होती. मात्र पक्षामध्ये निर्माण झालेल्या बंडखोरीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रामुख्याने अथणी मतदारसंघात आपण स्वीकारलेले आवाहन समर्थपणे पेलले आहे. याचा  आनंद आहे. यामुळेच मंत्रिपद देण्यात आल्याचे ते म्हणाले. 

बेळगाव जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. जिल्ह्याचे विभाजन केल्यास सुरळीत कामकाजासाठी मदत होणार आहे. यासाठी गोकाक जिल्हा व्हावा, याकरिता राज्य सरकारवर दबाव आणण्यात येत असल्याचेही ना. जारकीहोळी यांनी सांगितले. चिकोडी जिल्हा व्हावा याला आपला विरोध नाही. गोकाक तालुका व्हावा यासाठी बैलहोंगल तालुक्यातील नागरिकांनी नवीन मागणी ठेवली आहे. जिल्ह्याचे विभाजन करण्यापूर्वी तालुक्यांची पुनर्रचना करावी. यरगट्टीला तालुक्याचे स्थान देण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वीही गोकाक जिल्हा करावा, यासाठी सरकारवर दबाव आणण्यात आला होता. त्याप्रमाणेच या सरकारवरही दबाव आणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.