Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Belgaon › अन्‍नभाग्य योजनेत वाढता भ्रष्टाचार 

अन्‍नभाग्य योजनेत वाढता भ्रष्टाचार 

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 7:54PMबेळगाव : प्रतिनिधी

अन्‍नभाग्य योजनेतील तांदळाची होणारी काळ्या बाजारातील विक्री पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या पंधरवड्यात डीसीबी पोलिसांनी कारवाई करून सदर प्रकार उघडकीस आणला. येथील घटना ताजी असताना पोलिसांनी निपाणीतील बस्तवाड येथे छापा टाकून 30 टन तांदूळ जप्‍त केला. यामुळे अन्‍न व नागरी पुवरवठा खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

गोरगरिबांना सवलतीच्या दरात अन्‍नधान्य उपलब्ध व्हावे. या हेतूने राज्यात अन्‍नभाग्य योजनेंतर्गत वितरीत होणार्‍या तांदळाची चोरीच्या मार्गाने विक्री करण्यात येत असल्याचे प्रकरण उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. योजनेतील होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी भ्रष्टाचार रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते. काही दिवसापूर्वी तिसर्‍या रेल्वे गेट येथील चोण्णद राईस मिलमध्ये अनधिकृतरीत्या विक्री केल्या जाणारा अन्‍नभाग्यचा शंभर क्‍विंटल तांदूळ डीसीबी पोलिसांनी छापा टाकून जप्‍त  केला होता. यात सहभागी असणार्‍या तिघांना अटक झाली आहे. यासंदर्भात अन्‍न व नागरी पुरवठा खात्याने पोलिस आयुक्‍तांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.ही घटना ताजी असताना निपाणी  येथील बस्तवाड येथे छापा टाकून 30 क्‍विंटल  तांदूळ व साहित्य जप्‍त केले.  सरकारने योजनेतील तांदळाची काळ्या बाजारात होणारी विक्री थांबविण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कार्ड धारकांचे निवडणूक ओळखपत्र, नोंदणी क्रमांक व आधार लिंक केली आहे. या माध्यमातून तांदूळ वितरीत होत असला तरी तांदूळ आला कोठून, याचा तपास लागणे गरजेचे आहे.