Fri, Apr 19, 2019 12:46होमपेज › Belgaon › अण्णांच्या सभेने काय साधले?

अण्णांच्या सभेने काय साधले?

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 10:56PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

मागील काही दिवसापासून बेळगवकरांची उत्सुकता ताणलेली अण्णा हजारे यांची बहुचर्चित सभा अखेर शुक्रवारी पार पडली. सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यामुळे संयोजकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. परंतु, अण्णा हजारे यांच्या  दौर्‍यातून काय साधले, असा प्रश्‍न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

अण्णा हजारे यांच्या नावाभोवती  देशभर एकप्रकारचे वलय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या उपोषणाने सामान्य भारतीयांची मने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पेटविली. त्याच उपोषणाचा वापर करून त्यांनी देशात लोकप्रियता मिळविली आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीश्‍वरांचे तख्त अनेकवेळा अडचणीत आणले. काहींनी त्याचा वापर करून सत्तासोपान सर केले. परिणामी हजारे यांच्या नावाबद्दल सामान्यांमध्ये उत्सुकता भरून आहे. याचे प्रत्यंत्तर शुक्रवारी झालेल्या सभेतून जाणवले.खरेतर सभेच्या तोंडावर काहींनी अण्णा हजारेंनी सीमाप्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यावरून चर्चा रंगली. अण्णा हे देशपातळीवरील नेते असल्यामुळे त्यांनी भूमिका घेतल्यास सीमाबांधवांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, अण्णांनी याबाबत त्यांचे लाडके मौनव्रत धारण करण्यात समाधान मानले. 

परिणामी मराठी जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात आली. इतकेच नव्हे तर अण्णांनी मराठीतून संवाद साधला नाही. सभेला उपस्थित असलेले नागरिक हे सर्व मराठी भाषिक होते. त्यामुळे मराठीतून संवाद साधला असता तर त्यांच्या आवाहानाचा अधिक परिणाम निश्‍चितपणे झाला असता. अण्णांचा हा दौरा 23 मार्चपासून दिल्लीत होणार्‍या देशव्यापी आंदोलनाबाबत जागृती करण्यासाठी होता. अण्णांनी यावरच अधिक भर दिला. जनलोकपाल विधेयक आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न घेऊन आगामी आंदोलन छेडण्यात येणार आहे. यासाठी आर या पार ची हाक देण्यात आली. 

सभेकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली. अण्णांचे आंदोलन शेतकर्‍यासाठी आहे. त्यांनी पिकविलेल्या पिकाला खर्चावर आधारित दर मिळावा,  किसान पेन्शन विधेयक मंजूर करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी शेतकर्‍यांमध्ये जागृती होणे अत्यावश्यक होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी शेतकर्‍यांची उपस्थिती दिसून आली नाही. अण्णांनी यावेळी कार्यकर्त्यासाठी 100 रुपयाच्या प्रतिज्ञापत्र देण्याचे बंधनकारक केल्याचे सांगितले. याला देशभरातील  4 हजार जणांनी प्रतिसाद दिला आहे.परंतु स्थानिक पातळीवर कितीसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संयोजकांना मराठीचा विसर

सभेसाठी अधिक प्रमाणात मराठी भाषिकांनी हजेरी लावली होती. यामुळे सूत्रसंचालकांनी मराठीतून सुरेख सूत्रसंचालन केले. परंतु प्रास्ताविकापासून अन्य मराठी भाषिक वक्त्यांनी हिंदीतून संवाद साधण्याची चांगलीच कसरत केली. हिंदी, इंग्रजी या धेडगुजरी भाषणांनी श्रोत्यांची चांगलीच करमणूक झाली.