Mon, Jun 17, 2019 05:02होमपेज › Belgaon › तर न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडेल

तर न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडेल

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 7:48PM

बुकमार्क करा
अंकली : संतोषकुमार कामत

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार  परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाचेे प्रशासक योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्‍वभूमीवर चिकोडी तालुक्यातील काही वकील व जनता जनार्दनाने आपली मते परखडपणे व्यक्त केली. न्यायव्यवस्थेबाबत उघडपणे बोलणे हे धक्कादायक आहे. तर काहींनी हा वाद अंतर्गत आपापसात मिटवावा. न्यायाव्यवस्थेमध्ये समाजकारण आणू नये. अन्यथा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. न्यायव्यवस्था ही भारतीय लोकशाहीचा स्तंभ आहे. या स्तंभावरच लोकांचा विश्‍वास राहिला आहे आणि त्याच संस्थेमध्ये जर असे प्रकार व्हायला लागले तर या गोष्टीचा परिणाम न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास उडण्यावर होईल. लोकशाहीला व कायदे पाळण्याला आणि

न्यायव्यवस्थेला हे सर्व हानिकारक आहे. हे प्रकार आपापसात मिटविले गेले पाहिजेत. -अ‍ॅड. प्रदीप पोतदार, येडूर   न्याय व्यवस्था ही चौथा आणि अतिशय विश्‍वासू स्तंभ आहे. आजही भारतामध्ये न्यायव्यवस्थेबद्दल आदर आहे. असे असताना न्याय व्यवस्थेविरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका करणे असमर्थनीय आहे. तसेच ही न्यायव्यवस्थेसाठी धक्कादायक बाब आहे.  -अ‍ॅड. मारुती नेरली, चिकोडी सर्व न्यायमूर्ती प्रचंड अनुभवी आहेत. त्यांची अंतर्गत घुसमट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वापुढे मांडली. याचा येणार्‍या काळात खूप परिणाम होणार आहे. हा विषय आपसात मिटणे गरजेचे आहे. नाही तर कोणाचाही न्याय व्यवस्थेवर विश्‍वास राहणार नाही. हे लोकशाहीला मारक होईल. 

- अ‍ॅड. बसवराज कांबळे, चंदूर भारताच्या संविधानाने संसद, न्यायव्यवस्था प्रशासन आणि प्रसार माध्यमांना स्वातंत्र्य दिले आहे. त्याला त्याचे काम करत असताना काही हक्क दिले आहे. ते आपापले काम करत असताना संविधनाच्या मूल्यांवर गदा येत असेल तर निश्‍चित हे लोकशाहीसाठी घातक आहे.   -प्रभाकर शिंदे, अंकली लोकशाहीत सर्वात जास्त विश्‍वास न्यायव्यवस्थेवर आहे, अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायाधीशांनीच न्याय व्यवस्थेबद्दल माध्यमामध्ये प्रश्‍न निर्माण करणे खेदजनक आहे. हा प्रकार म्हणजे एकमेकांच्या अंतर्गत कुरघोड्या असल्याची शक्यता आहे. त्या चव्हाट्यावर यायला नकोत. त्यामुळे सर्वसामान्यांपुढे न्याय व्यवस्थेबाबत वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.  - बाबासाहेब सदलगे, वरलापूर