Tue, Aug 20, 2019 04:37होमपेज › Belgaon › जनावरांनाही मिळणार आता आधार क्रमांक

जनावरांनाही मिळणार आता आधार क्रमांक

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 11:10PMबेळगाव ः प्रतिनिधी

 नागरिकांना देण्यात आधार क्रमांकाप्रमाणे जनावरांनाही विशिष्ट ओळख क्रमांक दिला जात आहे. पशुसंगोपन खात्यातर्फे दुभत्या गाईंच्या कानाला क्रमांकाचा टॅग चिकटविण्यात येत आहे.

देशी आणि मिश्र जातीच्या जनावरांना बारा अंकी विशिष्ट क्रमांक मिळत आहे. यामुळे त्यांना सहजपणे ओळखता येते. राष्ट्रीय दुग्धोत्पादन विकास मंडळातर्फे (इन्फॉर्मेशन नेटवर्क फॉर अनिमल प्रॉडक्टविटी अँड हेल्थ : इनाफ) या क्रमांकावर संबंधित जनावराची सर्व माहिती नोंदविली जात आहे. राज्यात एकूण 46 लाख दुभती जनावरे आहेत. त्यापैकी 7 लाख जनावरांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आला आहे. योजनेकरिता 2,980 टॅॅब्लेट खरेदी करण्यात आले असून 7.16 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून 60 टक्के आणि राज्य सरकारतर्फे 40 टक्के निधी योजनेसाठी खर्च केला जात आहे.

विशिष्ट क्रमांक दिल्याने अनेक प्रकारचे निरीक्षण करता येणार आहे. दुभत्या जनावरांकडून अधिक दुधाचे उत्पादन, त्यांचे आरोग्य, वर्तणूक, त्यांच्यापासून होणार्‍या संसर्गाची माहिती सहजपणे मिळणार आहे. शिवाय विमा, कर्ज सुविधा, अचानक मृत्यूवेळी भरपाई मिळवताना हा क्रमांक उपयोगी पडणार आहे. 

याबाबतची सर्व माहिती सॉफ्टवेयरमध्ये संग्रहित केली आहे. बारकोडचा वापर यासाठी केला जात असल्याने कर्नाटकातील शेतकर्‍याने इतर राज्यात जनावराची विक्री केली तरी तेथे पुन्हा एकदा जनावराची नोंदणी होते. त्यामुळे कोणत्या शेतकर्‍याने कुणाला जनावर विकले याचा शोध तत्काळ लागतो. यामुळे संबंधित जनावरामुळे रोगाचा प्रसार होत असल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळविता येते.

ऑनलाईन जनावर बाजार

जनावर खरेदीसाठी शेतकर्‍यांना आता दूरपर्यंत जावे लागत नाही की एजंटांची मदत घ्यावी लागत नाही. डिजिटल इंडिया अभियान अंतर्गत केंद्र सरकारने ‘इ-पशुहाट’ नावे ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध केली आहे. 2020 पर्यंत शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ व्हावी, हा उद्देश आहे. त्याकरिता जनावरांचा बाजार ऑनलाईन करण्यात आला आहे. सर्व ठिकाणची जनावरे, त्यांचे मालक, दूध देण्याचे प्रमाण आदी माहिती पशुसंगोपन खात्यातर्फे www.epashuhaat.gov.in वर देण्यात आली आहे.