Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Belgaon › पाऊण लाख जनावरांना लाळखुरकत प्रतिबंधक लस

पाऊण लाख जनावरांना लाळखुरकत प्रतिबंधक लस

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 04 2017 9:54PM

बुकमार्क करा

खानापूर : वासुदेव चौगुले

भारताला लाळखुरकतमुक्त बनविण्यासाठी सुरू असलेल्या एफएमडी (फूट अँड माऊथ डिसीज) लसीकरण मोहिमेंतर्गत तालुक्यातील पाऊण लाख जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात आली. उर्वरित तीन ते चार हजार जनावरांसाठीही लवकरच  पुन्हा मोहीम राबवणार असल्याची माहिती तालुका पशुवैद्याधिकारी डॉ. जी. पी. मनगोळी यांनी दिली.

गोधनाच्या बाबतीत खानापूर तालुका समृद्ध आहे. पुरेशा खबरदारीअभावी अनेकदा हे गोधन संकटात सापडल्याचे प्रकार घडले आहेत. वाढत्या आजारांच्या पार्श्‍वभूमीवर पशुखात्याकडून विविध सतर्कता उपक्रम राबविले जात आहेत. पाळीव जनावरांना विशेषकरुन गाय, बैल, म्हैस आणि डुकरांना  तोंड व पायांना जखमा होऊन लाळखुरकत रोगाची लागण होते. रोगाच्या प्राथमिक टप्यात जनावर अशक्त होते. खाद्यावरची त्याची इच्छा नाहिशी होते. कालांतराने जनावर दगावण्याचाही धोका असतो.

या आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी सहा वर्षापासून लाळखुरकत मुक्त अभियानांतर्गत वर्षातून दोनवेळा लसीकरण केले जात आहे. लाळखुरकत रोगापासून जनावरांना संपूर्ण मुक्तीसाठी सतत दहा वर्षे लसीकरण करणे आवश्यक आहे. यंदा सहावे वर्ष असून आणखी चार वर्षे लसीकरण करणे गरजेचे आहे. 1 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सर्वत्र ही मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी पशूवैद्यकीय विभागाच्या कर्मचार्‍यांनी गावा-गावात जाऊन लसीकरणाचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी प्रयत्न केले.

गाभण असलेले जनावर आणि तीन महिन्याच्या आतील वयोगटाच्या जनावरांना ही लस देता येत नाही. त्यामुळे या लसीसाठी तालुक्यातील 78 हजार जनावरे पात्र ठरली होती. उर्वरित जनावरांनाही रोग होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी पुन्हा लवकरच लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे.78 हजार जनावरांमध्ये 36 हजार 98 गाय व बैल तर 37 हजार 5 इतक्या म्हशी व रेड्यांचा समावेश आहे. यंदाच्या मोहिमेला जनावर पाळणार्‍यांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याने 90 टक्के लसीकरणाचे समाधानकारक उद्दिष्ट्य गाठता आले आहे.

सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. दिवसा कडक ऊन तर सकाळी व रात्रभर कडाक्याची थंडी जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे जनावरांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याचा संभव असतो. त्यामुळे योग्य पद्धतीचे खाद्य आणि स्वच्छ पाण्याबरोबरच जनावरांची स्वच्छताही महत्त्वाची असल्याचे मत डॉ. मनगोळी यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.