Tue, Apr 23, 2019 21:50होमपेज › Belgaon › जनावरे ७० हजार; लस १५ हजारांना पुरेल इतकीच

जनावरे ७० हजार; लस १५ हजारांना पुरेल इतकीच

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 11:43PMभडगाव :  वार्ताहर

जलसमृद्ध कागल तालुक्यात शेतीलापूरक दुग्धव्यवसाय शेतकर्‍यांचा आधार बनला आहे. कागल तालुक्यात 70 हजार पशुधन आहे. परंतु, संबंधित पशुसंर्धन विभागाकडून मुबलक सुविधा मिळत नसल्याचे वास्तव असून, केवळ 15 हजार जनावरांना पुरेल इतकीच लस उपलब्ध आहे. लाळीच्या साथीने गत आठवड्यात अनेक जनावरे दगावली आहेत. तर पाच ठिकाणी पशुधन अधिकारीच नाहीत. तर वर्षातून दोन वेळा जनावारांना लाळप्रतिबंधक लस देणे बंधनकारक असताना कागलमध्ये एक वर्षानंतर अपुरी लाळ खुरकत प्रतिबंध लस उपलब्ध झाली असून पशुपालकांतून नाराजी पसरली आहे.

कागल तालुक्यात बरामाही वाहणार्‍या दोन नद्या आहेत. त्यामुळे ऊस, ज्वारी, मका या पिकांतून कायम हिरवी वैरण उपलब्ध होते. शेतीला पूरक व बेरोजगारीला पर्याय म्हणून अनेक तरुण दुग्ध व्यवसाय करत आहेत. परंतु, संबंधित पशुसंवर्धन वेळेत सुविधा व शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या भावना पशुपालकांत आहेत.

विभागाकडील केनवडे, सांगाव, लिंगणूर, बाचणी, सोनगे या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार प्रभारीवर सुरू असून हजारो जनावरांना उपचाराविना रहावे लागत आहे. परिणामी या पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडून भरमसाठ पैसे मोजून जनावरांच्या उपचारासाठी उपचार करून घ्यावे लागत आहेत. तर लाळ खुरकत प्रतिबंध लस वर्षातून दोन वेळा एप्रिल व मे महिना आणि डिसेंबर व जानेवारी महिन्यात लाळखुरकत प्रतिबंधक लस दिली जाते. परंतु, गेल्या एक वर्षापासून लस मिळाली नव्हती.

गेल्या आठवड्यात लस उपलब्ध झाली असून संबंधित विभागाचे पशुपर्यवेक्षक थेट जनावारांच्या गोठ्यात जाऊन लस देत आहेत. परंतु, ही लस अपुरी पडणार आहे. तालुक्यातील 70 हजार जनावरांपैकी दुभत्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जनावरांसाठीचे पशुखाद्य व अनेक उपचारांमुळे होणारा खर्च व गायीच्या दुधाचे दरात झालेली कपात यामुळे हा व्यवसाय आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. लाळीच्या साथीने जनावारे दगावत असतात गेल्या आठवड्यात सांगाव येथील दहाहून आधिक तर दोन वर्षांपूर्वी भडगा,  कुरणी, मळगे येथील पंचवीसहून अधिक जनावारे दगावली होती. त्यामुळे या साथीची पशुपालक काळजी घेत असतात, मागणी करतात तर ही लस खासगी डॉक्टरकडे किंवा दवाखान्यात मिळत नाही. त्यामुळे पशुपालकांना शासनाच्या लस पुरवठ्याची वाट बघावी लागत आहे.