होमपेज › Belgaon › आमदारांकडून बिम्स अधिकारी धारेवर

आमदारांकडून बिम्स अधिकारी धारेवर

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:39PMबेळगाव : प्रतिनिधी

येथील जिल्हा इस्पितळ तात्काळ उपचार विभागासमोरील ड्रेनेजचे  पाणी गेल्या महिन्यापासून रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आह. यामुळे त्रस्त झालेल्या रिक्षाचालकांनी तक्रार केल्याने आ. अ‍ॅड. अनिल बेनके यांनी जिल्हा इस्पितळाला भेट देऊन निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल बिम्सच्या अधिकार्‍यांना धारेवर धरून समस्याचे त्वरित निवारण करण्याची सूचना केली.

जिल्हा इस्पितळ आवारातील ड्रेनेजलाईन ब्लॉक झाल्याने पाण्याचा निचरा ठप्प झाला आहे. त्यामुळे सदर आवारातील सांडपाणी गेल्या महिन्यापासून रस्त्यावरून वाहत आहे. याबाबत रिक्षाचालकांनी बिम्स संचालक डॉ. कळसद व मनपा आयुक्तांना निवेदन देऊन ड्रेनेज पाण्याची समस्या निवारण करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे लक्ष देण्यात आले नव्हते. ड्रेनेज पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून त्याचा नाहक त्रास इस्पितळातील रुग्णांसह वैद्याधिकार्‍यांनाही सोसावा लागत आहे. 

इस्पितळाशेजारी असणार्‍या रिक्षा स्टॅण्डमधील रिक्षाचालकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत होता. जिल्हा इस्पितळ आवारातून येणारे ड्रेनेजचे पाणी रिक्षास्टॅण्डमध्ये शिरत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना दुर्गंधीचा सामना रोज करावा लागत आहे. अधिकार्‍यांना याबाबत माहिती देऊनही दखल घेतली गेली नसल्याने संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी क्‍लब रोड बंद करून आंदोलन केले होते. तसेच बिम्स संचालक डॉ. कळसद यांना व मनपा आयुक्तांना याची माहिती दिली होती. मात्र, सदर दोन्ही अधिकार्‍यांनी एकमेकाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली होती. त्यामुळे आ. अनिल बेनके यांच्याकडे समस्येबाबत तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेऊन आ. अनिल बेनके यांनी जिल्हा इस्पितळाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. 

स्वच्छतेचे धडे देणार्‍या आरोग्य विभागातच निर्माण झालेल्या गलिच्छ वातावणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरामध्ये अनेक भागात डेंग्यूचा फैलाव झाला आहे, असे असताना जिल्हा इस्पितळातील निर्माण झालेल्या परिस्थितीवरून आ. बेनके यांनी वैद्याधिकार्‍यांची झाडाझडती केली. सदर समस्या त्वरित निवारण करून परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचनाही आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना केली. 

यावेळी उपमहापौर मधुश्री पुजारी, नगरसेविका सुधा भातकांडे, नगरसेवक विनायक गुंजटकर, अभियंता हिरेमठ, आरोग्य अधिकारी शशिधर नाडगौडा, उदयकुमार तळवार, अप्पासाहेब पुजारी आदी उपस्थित होते. यासंदर्भातील अहवाल देण्याची सूचनाही अधिकार्‍यांना करण्यात आली आहे.