Sat, Mar 23, 2019 16:08होमपेज › Belgaon › बंडखोर काँग्रेस नेत्यावर हल्ला

बंडखोर काँग्रेस नेत्यावर हल्ला

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:13AMबेळगाव : प्रतिनिधी

सौंदत्ती-यल्‍लम्मा विधानसभा मतदारसंघातील बंडखोर काँग्रेस उमेदवार आनंद चोप्रा यांच्यावर खुनी हल्ला झाला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून हुली रोडवरून जात होते. वाटेत अचानक नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलीवरून समोर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर शस्त्रास्त्राने हल्‍ला केला. घटनास्थळी रक्‍ताने माखलेला लोखंडी रॉड मिळाला आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तत्काळ त्यांना हुबळीतील इस्पितळात दाखल करण्यात आले. डोक्याला 19 टाके घालण्यात आले आहेत. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. भाजप उमेदवार आनंद मामनी यांच्याकडून 6,291 मतांनी ते पराभूत झाले होते. 

घटनास्थळी जिल्हा पोलिसप्रमुखांसह अधिकार्‍यांनी पाहणी केली. राजकीय द्वेषातून हा हल्‍ला झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. भाजप आमदार आनंद मामनी यांच्या घरानजीक हा हल्‍ला झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

“तपास सुरू करण्यात आला आहे. चौघांवर संशय आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल. अज्ञातांकडून खुनी हल्‍ला झाल्याची तक्रार आनंद चोप्रा यांच्या बंधूंनी दिली आहे.” -सुधीरकुमार रेड्डी, जिल्हा पोलिसप्रमुख

“राजकारण्यांवर हल्‍ला होणे दुर्दैवी आहे. याची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाला भाग पाडू.” -आनंद मामनी, आमदार, सौंदत्ती-यल्‍लम्मा