Mon, May 27, 2019 09:18होमपेज › Belgaon › अतिकुपोषित बालकांचा प्रश्‍न ऐरणीवर

अतिकुपोषित बालकांचा प्रश्‍न ऐरणीवर

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 9:48PMबेळगाव : प्रतिनिधी

बालविकास योजनेंतर्गत अतिकुपोषित बालकांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अंगणवाडी केंद्रात दर्जेदार आहार व पॅकबंद रेशन वितरण करण्यात येत आहे. तरीदेखील जिल्ह्यात कुपोषणामध्ये बालकांची घट झाली नाही. अंगणवाडीत बालकांना व गर्भवती महिलांना सकस आहार देण्यात येत आहे. मात्र देशात जातीचा अडसर आल्याने सकस आहाराकडे पाठ फिरविण्यात आली आहे.  

जिल्ह्यात  अतिकुपोषित बालकांचे वजन वाढविण्यासाठी पालक, अंगणवाडी, बालक व सेविकांच्या माध्यमातून सकस आहार पुरविला जातो.  आतापर्यंत शासनाच्या योजना कागदावरच राबविल्या आहेत. जिल्ह्यात अतिकुपोषित बालकांचा शोध घेण्याचे काम प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. कुपोषित मुलांना सकाळ ते संध्याकाळी 6 पर्यंत भूक लागेल त्याप्रमाणे सकस आहार पुरविणे गरजेचे आहे.नजीकच्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून औषधोपचारदेखील करणे आवश्यक आहे. जोपर्यंत समस्येच्या मुळाशी जाऊन कार्य होत नाही तोपर्यंत अतिकुपोषणाचा प्रश्‍न मार्गी लागणार नाही. 

अंगणवाडीत प्रत्येक मुलाला 6 किलो गहू, 1 किलो 944 ग्रॅम मूग, 240 ग्रॅम साखर, 600 ग्रॅम गूळ,  एक अंडे वितरण करण्यात येते.  गुळ व अंडी सोडून सर्व साहित्य पॅक बंद पाकीटमधून मिळत आहे. यापूर्वी हे साहित्य सुटे येत होते. त्यावेळी अंगणवाडीतील कर्मचारी ते वजन न करता अंदाजे वितरित करत होते. यासंबंधी तक्रारी गेल्याने आता पॅकबंद येत आहे.अंगणवाडीत गर्भवती महिलांना सकस आहार  देण्याचे नियोजन आहे. मात्र अंगणवाडीत सकस आहार करण्यासाठी कमी जातीच्या महिला काम करत असल्याने गर्भवती महिला आहार घेण्यासाठी अंगणवाडीत येत नाहीत. त्याशिवाय दोन मुलांत एक ते दोन वर्षाचे अंतर नसल्याने मुले कुपोषित जन्माला येत  आहेत. यासाठी तळागाळातील गरीब महिलांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.