Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Belgaon › ...तरीही हुंदरे मंचने बोलावली बैठक

एकीच्या प्रयत्नांना ‘त्यां’चा सुरुंग

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 1:05AMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सार्‍या गटांमध्ये एकी व्हावी, यासाठी सुरेश हुंदरे स्मृती मंच आणि मराठीचे पाईक प्रयत्न करत असतानाच, त्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न किरण सायनाक गटाने केला आहे. मंचच्या निर्णयाशी आपण बांधील नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तथापि, आम्ही प्रयत्न सुरूच ठेवणार असून, प्रत्येक मतदारसंघातील दोन्ही गटांच्या अध्यक्ष आणि सचिवांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे, अशी माहिती मंचने दिली आहे.

12 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत सीमाभागातील प्रत्येक मतदारसंघात एकच मराठी उमेदवार असावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी हुंदरे स्मृती मंच आणि पाईक गटाची बैठक आदर्श सोसायटीमध्ये झाली. अर्ज भरलेल्या प्रत्येक गटाने आपला एक उमेदवार निश्‍चित करावा, असे आवाहन मंचने केले आहे. प्रत्येक गटाने एक उमेदवार निश्‍चित केल्यास दोन्ही गटांची एकी करताना सोपे जाईल, असा निर्णय मंचच्या बैठकीत झाला. सध्या मध्यवर्ती समितीने निवडलेल्या उमेदवारांनीच अर्ज भरले असून, त्या गटातून दुसर्‍या कुणीही अर्ज भरला नाही. तर बंडखोर गटातून प्रत्येक मतदारसंघातून किमान चार नावे आहेत. त्यामुळे बंडखोर गटाने प्रत्येक मतदारसंघातून आधी एक उमेदवार निश्‍चित    करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मध्यवर्तीने बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण आणि खानापूरसाठी निवडलेले उमेदवार आणि बंडखोर गटाने याच मतदारसंघासाठी निवडलेले प्रत्येकी एक उमेदवारी यांची सांगड घालून प्रत्येक मतदारसंघातून एकच मराठी उमेदवार देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी तिन्ही मतदारसंघातील दोन्ही गटांंचे अध्यक्ष, सचिव आणि निवडलेला उमेदवार यांनी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता बैठकीला यावे, असे आवाहन मंचने केले आहे. अनगोळच्या आदर्श सोसायटीत ही बैठक होईल.

मंचशी बांधील नाही; किरण गटाचा दावा

महाराष्ट्र एकीकरण समितीने पारदर्शक निवड समिती नेमून इच्छुक उमेदवारांची सर्व दृष्टिकोनातून चाचपणी करून आम्हा चौघांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहे. यानुसार बुधवारी (दि. 25) आम्ही रीतसर अर्ज दाखल करून पात्रता सिद्ध केली आहे. मात्र, सुरेश हुंदरे मंचच्या निर्णयाला आम्ही बांधील नाही, असे प्रसिद्धीपत्रक किरण सायनाक गटाने दिले आहे. त्यावर किरण सायनाक किरण गावडे, पंढरी परब, रतन मासेकर यांच्या सह्या आहेत.

12 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत सीमाभागातील मतदारसंघांमध्ये एकच योग्य उमेदवार उभा राहावा, अशी म.  ए. समितीची स्पष्ट भूमिका आहे. तसेच मंचने उल्लेख केल्याप्रमाणे दि. 22 रोजी पार पडलेल्या मंचच्या प्रार्थना मेळाव्यामध्ये पाईक या संघटनेसमोर ‘इन कॅमरा’ डॉ. एन. डी. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचा आपण जाहीर निषेध करणार होता. तो अद्यापही प्रत्यक्षात उतरलेला नाही. त्यामुळे समस्त सीमावासीय व समितीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांकडून मंचचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. सद्यपरिस्थितीत वरील सर्व कारणामुळे मंचकडे नागरिक संशयाने बघू लागले आहेत. तसेच वेळोवेळी मंचने घेतलेल्या भूमिकेमुळे संघटनेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहेत. याचा विचार करून आम्ही चौघेही मंचच्या एकतर्फी निर्णयाला बांधिल राहणार नाही, असे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.