Sun, Nov 18, 2018 21:51होमपेज › Belgaon › मराठी कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न

मराठी कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 8:59PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मराठी युवक एकवटत आहेत. याचा धसका राष्ट्रीय पक्षांनी घेतला असून युवा कार्यकर्त्यांना धमकावण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे मराठी भाषकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे.

म. ए. समितीने बेळगाव शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. दोन्ही मतदारसंघांतून कोणत्याही परिस्थितीत म. ए. समितीचा अधिकृत उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासून प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या राजकीय नेत्यांच्या समर्थकांकडून युवा कार्यकर्त्यांना धमकावण्याचे सत्र सुरू झाले आहे.

राजकीय पक्षांच्या नादी लागलेल्या मराठी युवकांना समितीच्या छताखाली आणण्याचा प्रयत्न युवा कार्यकर्त्यांनी  चालविला आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत असून सीमालढ्याबाबत प्रबोधन चालविले आहे. याला युवकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून ते समितीच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत. 

मराठी मतांवर डोळा ठेवून कार्यरत झालेल्या इच्छुकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. त्यांच्या समर्थकांकडून वैफल्यातून म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. समिती नेत्यांबाबत खोटानाटा प्रचार केला जात आहे. यावर व्यक्त होणार्‍या युवकांना मोबाईलच्या माध्यमातून धमकावण्यात येत आहे. 

असा प्रकार बुधवारी बापट गल्ली येथे घडला. काही जणांनी या ठिकाणी येऊन म. ए. समिती कार्यकर्त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे मराठी भाषकांत संतापाची लाट उसळली आहे. याप्रकारचे प्रकार वाढले असून पोलिस आयुक्तांना निवेदन देण्याची तयारी सुरू आहे.

विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. तरीदेखील शहरात राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांचा डोळा मराठी मतावर आहे. यामुळे गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. याविरोधात समितीकडून संघटितपणे उत्तर दिले जाणार आहे. म. ए. समितीतील बेकी दूर करून मराठी उमेदवार विजयी करण्याचा निर्धार मराठी भाषकांनी केला आहे. यामुळे बिथरलेल्या इच्छुकांनी गुंडाचा आसरा घेऊन नसते उपद्व्याप सुरू केले आहेत.