Sat, May 30, 2020 05:35होमपेज › Belgaon › महाराष्ट्रातील कन्नडिगांना चेतवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कन्नडिगांना चेतवण्याचा प्रयत्न

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:16AMबेळगाव : प्रतिनिधी

एकीकडे सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात जाण्यासाठी आतूर झाले असताना दुसरीकडे कर्नाटकातील कानडी नेत्यांनी महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना चेतवण्याचा उपद्व्याप सुरू केला आहे. मात्र महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना चांगलीच चपराक बसली आहे.भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिकांना अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आले. त्याचबरोबर काही कन्नड भाषिकांना महाराष्ट्रात राहावे लागले. परिणामी दोन्ही राज्यातील भाषिक अल्पसंख्याकांची कोंडी होत आहे. यातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न तब्बल 62 वर्षानंतर कानडी नेत्यांनी चालविला आहे.

बेळगाव, कारवार, निपाणी, चिकोडी, खानापूर, बिदर, भालकी परिसरातील मराठी भाषिकांनी सुरुवातीपासूनच अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे. भाषिक तत्वानुसार राज्यरचना झाल्याने मराठी बहुल भाग महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह करण्यात आले. मात्र अद्याप यश मिळालेले नाही. परिणामी हा लढा सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आला आहे. त्याठिकाणी महाराष्ट्राकडून सीमाभागातील 865 मराठी खेडी महाराष्ट्रात समाविष्ठ करण्याची मागणी केली आहे.

यामुळे गर्भगळीत बनलेल्या कर्नाटकी नेत्यांनी महाराष्ट्रातील सीमाभागात असणार्‍या कानडी भाषिकांना फूस लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी गडहिग्लज भागातील कानडी भाषिक कर्नाटकात येण्यासाठी इच्छुक असल्याची आवई उठविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर शनिवारी अथणी परिसरात सीमेवर असणार्‍या महाराष्ट्रातील काही कानडी भाषिकांना हाताशी धरून महाराष्ट्रात आपला विकास खुंटला आहे. त्यामुळे हा भाग महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला.

येत्या काळात हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कानडी नेत्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात कानडी भाषिकांची गळचेपी केली जाते. असा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. परिणामी हा भाग महाराष्ट्रातून कर्नाटकात समाविष्ठ करण्याची मागणी लावून धरण्याचा प्रयत्न होणार आहे.यापूर्वी जत परिसरातील काही कानडी भाषिकांनी पाण्याच्या समस्येला कंटाळून हा भाग कर्नाटकात घालण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर तेथील जनतेने घूमजाव करत आपली मागणी विकासाची असल्याचा खुलासा केला होता.

काही नेत्यांची फूस

मागील काही दिवसांपासून कानडी नेत्यांनी नसता उपद्व्याप सुरू केला आहे. महाराष्ट्रातील काही भागात कर्नाटक रक्षण वेदिकेचे संघटन बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. बेळगाव परिसरात सुरू असणार्‍या मराठीच्या चळवळीला शह देण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी काही राजकीय नेत्यांचीदेखील फूस असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रालादेखील सावध राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.