Sat, Jul 20, 2019 11:03होमपेज › Belgaon › ‘कर्नाटक’साठी अमित शहांची विशेष रणनीती

‘कर्नाटक’साठी अमित शहांची विशेष रणनीती

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 11:44PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांनंतर भाजपच्या नजरा कर्नाटकवर खिळल्या आहेत. मागील निवडणुकांतील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकसाठी प्लॅन बनविला आहे. या अंतर्गत भाजपचे भूपेंद्र यादव यांच्यावर कर्नाटक प्रभारीची जबाबदारी सोपविण्याचे घाटत आहे. 

मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांनंतर भाजपचे केंद्रीय नेते ‘मिशन कर्नाटक’साठी सतर्क झाले आहेत. राजस्थान आणि बिहारच्या निवडणुकांत प्रभारी असलेले भूपेंद्र यादव यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली सुरू आहेत. यादव  यांच्या नेतृत्वाखाली भाजपची नवी निवडणूक समिती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादव व त्यांचे सहकारी कर्नाटकात राहून प्रत्येक घडामोडीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहा यांना देणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीला स्वतंत्र अधिकार देण्यात आले आहेत. समितीमध्ये राज्याच्या भाजप नेत्यांनी हस्तक्षेप करू नये, याबाबतही विशेष दक्षता घेण्यात आली आहे. भाजप नेत्यांमधील मतभेद दूर करणे आणि काँग्रेसच्या विरोधात रणनीती आखण्याचे काम यादव यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.   

येत्या दोन दिवसात भाजपच्या केंद्रीय समितीने बनविलेल्या अमित शहा यांच्या निवडणूक फॉर्म्युल्याची माहिती कर्नाटकातील नेत्यांना देण्यात येणार आहे. मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि रेल्वेमंत्री मंत्री पीयुष गोयल यांनी काम पाहिले होते. जावडेकर आणि गोयल केंद्रीय मंत्रिमंडळात असल्यामुळे भूपेंद्र यादव यांच्याकडे कर्नाटक प्रभारी पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.हिंदुत्वाबरोबरच विकासाच्या मुद्याला निवडणुकीत प्राधान्य देण्यात येणार आहे. गोरगरीब आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कर्नाटकाला चांगले प्राधान्य देण्यात आले. कर्नाटक भाजपात तीन माजी मुख्यमंत्री आणि चार केंद्रीय मंत्री आहेत. या सर्वांनाही निवडणुकीची अनुकूल जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.