Mon, Jul 22, 2019 00:36होमपेज › Belgaon › पाच राज्यातील लोकसभा निवडणुकींची राजधानीपून सूत्रे हलविणार

अमित शहांचे बंगळूरमध्ये ‘दक्षिण’ मुख्यालय!

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 8:57PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्य विधानसभा निवडणुकीत मोठा पक्ष म्हणून विजयी झालेल्या भाजपला सत्तेपासून मात्र वंचित रहावे लागले. असे असले तरी भाजपाने बंगळूरला महापसंती दर्शविली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दक्षिणेसाठीचे आपले मुख्यालय बंगळूरला करण्याचे ठरविले असल्याचे समजते. येथूनच ते  दाक्षिणात्य राज्यातील लोकसभा निवडणुकीची सूत्रे हलविणार आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मुत्सद्दी आणि अमित शहा यांचे स्वीय अधिकारी बंगळूरमध्ये तळ ठोकून होते. यातील काहीजण बंगळूरमध्येच असून त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी एव्हाना सुरुही केली आहे. दक्षिण भारतातील पाच राज्यांसाठीच्या लोकसभा निवडणुकीची पक्षीय तयारी बंगळूरमधून करणे सुलभ असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. बंगळूरला मुख्यालय ठेवून अमित शहा यांना पाचही राज्यांचे दौरे करता यावेत, याबाबतची चाचपणी केली जात आहे. त्यादृष्टीने काही पक्ष पदाधिकार्‍यांनी कार्य सुरु केले आहे.

अमित शहा यांचे राज्यातील भाजप नेत्यांशी सौहार्दपूर्ण स्नेहबंध आहेत. तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून बंगळूर सोयीचे आहे. हे एकच कारण मुख्यालयासाठी नाही. सोपी भरती प्रक्रिया, तंत्रज्ञानयुक्‍त आवश्यक मूलभूत सुविधा यामुळेही शहा यांनी बंगळूरला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे दक्षिण भारतात कर्नाटक राज्य पक्षाचा मूळ पाया आहे. बंगळूरमध्ये राहून संघटन, व्यवस्थापन, संशोधन आणि भक्‍कम प्रचार राबविता येऊ शकतो असे सुत्रांनी सांगितले. बंगळूरमध्ये मुख्यालय केल्यास पक्षाला अनेक फायदे होऊ शकतात. कर्नाटक सध्या राजकीय दृष्ट्या अस्थिर आहे. यामुळे येथे सतत घडामोडी घडणार आहेत. त्यावर लक्ष ठेवता येईल.

अमित शहा यांच्या टीममध्ये बुद्धिमान लोकांचा (एबीएम) समावेश आहे. त्यांना बंगळूरमध्येच राहण्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यालयामध्ये तीन जणांचे पथक असेल. हे पथक केंद्रीय नेतृत्वाच्या सतत संपर्कात राहील. दक्षिणेतील राज्यांसाठी नियंत्रण कक्ष म्हणून या मुख्यालयाचे कामकाज चालणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांशी संपर्क, प्रचार धोरण, राजकीय स्थितीचे विश्‍लेषण हे काम कार्यालयीन कामकाज पाहणार्‍यांकडे सोपविण्यात येणार आहे असे एका राज्यस्तरिय नेत्याने सांगितले.

लोकसभेकडे लक्ष : कर्नाटकामध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत. यापैकी 20 हून अधिक मतदार संघात विजय मिळविण्यासाठी प्रचार यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. अमित शहा यांनी आपली स्वत:ची पलटण बंगळूरला पाठवू इच्छितात. विधानसभा निवडणुकीत राबविलेल्या प्रचार तंत्राचा आढावा घेऊन लोकसभेसाठी काही बदल करता येतात का याबाबतचा अहवाल मुख्यालयात तयार करण्यात येणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. अशाच पद्धतीची यंत्रणा दक्षिणेतील राज्यांसाठी तयार करण्यात येणार असल्याचे समजते.