Tue, Apr 23, 2019 23:40होमपेज › Belgaon › रुग्णवाहिकेचा श्‍वास गुदमरतोय वाहतूक कोंडीत! 

रुग्णवाहिकेचा श्‍वास गुदमरतोय वाहतूक कोंडीत! 

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 18 2018 10:43PMबेळगाव : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी व कुंदानगरी बेळगाव  आता वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख निर्माण होत आहे. दररोज शेकडो वाहने रस्त्यावर धावतात. अरुंद रस्त्यांमुळे रुग्णवाहिकांचा मात्र श्‍वास वाहतूक कोंडीत गुदमरतो आहे.

अपघात, प्रसूती, विषबाधा, संर्पदंश आदी उपचारांची तात्काळ आवश्यकता असलेल्या रुग्णांना जवळील मोठ्या रुग्णालयात दाखल करून उपचार करणे आवश्यक असते. या रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच वाहतूक कोंडीत अडकली तर रुग्णाचा जीव धोक्यात येतो. यातच काही वेळा चौकात रहदारी झाल्याने सायरन कितीही वाजवला तरी नागरिक जाण्यास बाजू देत नाहीत. यावर तोडगा काढावा, अशी रुग्णवाहिका चालकांची मागणी आहे. 

शहराचा विस्तार चोहोबाजूने वाढतोच आहे. दिवसेंदिवस वाहनांमध्येही भर पडत आहे. शहराची लोकसंख्या 5.50 लाखाच्या पुढे आहे. त्यातच अंतर्गत रस्ते अरुंद आहेत, यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच डोकेदुखी बनली आहे. याचा फटका वैद्यकीय सेवा देणार्‍या रुग्णवाहिकांना बसत आहे. 

शहरातील वाहतूक कोंडी प्रवाशांना नवीन नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ कोंडीत नगरासह, बाहेरील प्रवाशांचा जीव गुदमरतो. सध्या दोन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत चालली आहे. रेल्वे फाटकावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. यामध्ये रुग्णवाहिका अडकण्याचे प्रकार हमखास घडतात. याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. कपिलेश्‍वर उड्डाणपुलावर नियमितपणे वाहतूक कोंडी होते. हा मध्यवर्ती पूल असल्याने या भगातील रुग्णांना सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी या उड्डाणपुलाचा वापर केला जातो. मात्र, अनेकवेळा पुलावर कोंडी असते. अशावेळी अडथळे येतात.  

शहरातील चन्नम्मा चौक, यंदेखुट, आरटीओ सर्कल, गोगटे सर्कल, पहिले, दुसरे व तिसरे रेल्वे गेट या भागात नेहमीच कोंडी होते. अनेक वेळा रुग्णवाहिका अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका असतो. याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे.