Fri, Apr 26, 2019 19:17होमपेज › Belgaon › राकसकोप, हिडकल जूनपर्यंत पुरणार?

राकसकोप, हिडकल जूनपर्यंत पुरणार?

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 1:17AMबेळगाव : प्रतिनिधी 

बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणार्‍या राकसकोप व हिडकल जलाशयामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा आहे. मात्र हे पाणी जूनपर्यंत पुरणार का, हाच प्रश्‍न शहरवासीयांना भेडसावत आहे. त्यातच हिडलकले पाणी मे महिन्यांत कालव्याला सोडले जाते. हा प्रकार यंदा तरी थांबावा, अशी अपेक्षाही शहरवासीयांची आहे.

बेळगाव जिल्ह्यामध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई तूर्त नाही. मात्र येत्या मे महिन्यात स्थिती बिकट होऊ शकते. ते लक्षात घेऊन बेळगाव शहराला तीन दिवसांआड पाणी पुरवावे, अशी सूचना नुकतीच पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकार्‍यांना करण्यात आली. तरीही तीन दिवसांआड पाणी देऊनही जूनपर्यंत पाणी पुरणार नाही, असा अंदाज आहे.

राकसकोप जलाशयामध्ये बुधवारी पाण्याची पातळी 2464.05 फूट इतकी होती. गेल्या वर्षी 14 मार्च रोजी ही पातळी 2463.55 फूट इतकी होती. म्हणजे मागील वर्षापेक्षा यावर्षी पाणी पातळी दीड फूटाने जास्त आहे. राकसकोपची कमाल पाणी पातळी 2476.05 फूट असून, गेल्या साडेपाच महिर्न्यांत 12 फूट पाणी पातळी वापरण्यात आलेली आहे. हिडकल जलाशयाची पाणी पातळी बुधवारी 2112.73 फूट होती. ही पातळीही गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. गेल्यावर्षी पाण्याची पातळी 2112 फूट होती.

हिडकलमध्ये सध्या एकूण पाणीसाठी 12.19 टीएमसी आहे. एकूण 51 टीएमसीपैकी 2 टीएमसी पाणी बेळगाव शहारासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे.दोन्ही जलाशयांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी जलाशयामध्ये मुबलक साठा आहे. तथापि, एप्रिल आणि मे महिन्यांत शेतकर्‍यांची पिकांसाठी तसेच जनावरासांठी पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे हिडकलच्या दोन्ही कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते. त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर होतो. हे त्रांगडे पाणीपुरवठा मंडळाला सोडवावे लागणार आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई करून पिकांसाठी पाणी दिले जाऊ नये, अशी शहरवासीयांची मागणी आहे. मात्र आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना कसे समजवायचे, हाही प्रश्‍न आहे. परिणामी आतापासून पाण्याची बचत करण्याच्या उपाययोजना आखाव्या लागणार आहेत.