Wed, Apr 24, 2019 11:54होमपेज › Belgaon › सुरलमध्ये आजपासून महिनाभर दारूबंदी!

सुरलमध्ये आजपासून महिनाभर दारूबंदी!

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:10AMखानापूर : प्रतिनिधी

मद्यपींच्या हुल्लडबाजीमुळे हैराण झालेल्या सुरल (ता. सत्तरी) गावात उद्या शुक्रवार 20 जुलैपासून महिनाभरासाठी दारूबंदी लागू करण्यात आली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी लेव्हिन्सन मार्टिन यांनी गुरुवारी सायंकाळी याबाबतचा आदेश जारी केला असून, सुरलमधील सर्व बियर बार, हॉटेल्स आणि किरकोळ विक्रेत्यांवर  बंदी घातली आहे. 

कर्नाटकाच्या तुलनेत गोव्यात मद्याचे दर कमी असल्याने सीमेवरील सुरल गावात नजीकच्या बेळगाव जिल्ह्यातून पावसाळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक जातात. दारू पिऊन गोंधळ घालणे, कपडे काढून रस्त्यावरून फिरणे, अरुंद रस्त्यावर गाड्या लावून वाहतुकीला अडथळा करणे आदी गैरप्रकार घडत असल्याने याला सर्वस्वी मद्यपान हे कारणीभूत असल्याचे निरीक्षण या आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरी वसाहतीतील शांतता व सौहार्दता अबाधित राखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले आहे.

गावातील गोंधळ, अशांतता आणि मद्यपींच्या उपद्रवाचे मूळ कारण अनियंत्रित मद्य विक्री आणि मद्यप्राशन हे असल्याचे आढळून आल्याने पर्यटनाच्या नावावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ही तात्पुरती बारबंदीची कारवाई राबविण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या बार व दारु दुकान मालकांचा परवाना रद्द करण्याबरोबर भादंसं कलम 188 नुसार कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

ग्रामस्थांचा लढा

ग्रामस्थांनी दारुबंदीसाठी ‘आर या पार ’ लढाईचे हत्यार परजले आहे. सुरल येथील दारु दुकानांमुळे गावच्या शांततेला बाधा पोहचत असून महिलांचे तर जगणे मुश्किल होऊन बसले आहे. त्याकरिता गावातील सर्व बियरबार बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी गोवा सरकारकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. लोकलढ्याला अंशतः यश आले असून कायमस्वरुपी बंदीसाठी ग्रामस्थ आजही आग्रही आहेत.
दारुबंदीच्या आदेशासोबत गावात अस्तित्वात असलेल्या बियरबार व दुकानांच्या परवान्यांची पडताळणी करण्याचे आदेश गोव्याच्या अबकारी आयुक्तांना देण्यात आले आहेत.