Sun, Jul 21, 2019 12:27होमपेज › Belgaon › दलित मोर्चाच्या आधी अज्ञातांकडून दगडफेक

दलित मोर्चाच्या आधी अज्ञातांकडून दगडफेक

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 11 2018 12:05AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा दंगलीच्या  निषेधार्थ दलित संघटनांनी बुधवारी काढलेल्या मोर्चाआधी दगडफेक झाल्याने शहरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवल्याने काही काळानंतर तणाव निवळला. पोलिसांनी सायंकाळी काही युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

कोरेगाव भीमा दंगल, विजापूरमध्ये दलित युवतीवर बलात्कार आणि केंद्रीय मंत्री अनंतकमार हेगडे यांच्या घटनाबदलाच्या वक्‍तव्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणार्‍या काही दुचाकीस्वार युवकांनी अयोध्यानगर ते चन्‍नम्मा चौकापर्यंतच्या नामवंत कंपन्यांच्या इमारतींवर दगडफेक केली. सुमारे दहा दुकानांच्या दर्शनी भागाच्या काचा फोडण्यात आल्या.

विरोधात एकवटल्या दलित संघटना

बेळगाव : प्रतिनिधी 

भीमा-कोरेगाव, विजापूर येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेला अन्याय व केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शहरातील दलित संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. 
तत्पूर्वी विविध दलित संघटनांचे कार्यकर्त्यांनी संभाजी चौकात एकत्र येऊन कॉलेज रोड, चन्नमा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दलितांवरील अन्यायाचा व भीमा-कोरेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवून दलितांच्या संरक्षणासाठी ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी केली. 

दलितांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत दलितांच्या संरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी केली. राज्यासह देशामध्ये दलितांवर अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढतच आहे. अन्याग्रस्त कुटुंबांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. मल्लेश चौगुले, मल्लेश कुरंगी, मोहन कांबळे, अर्जुन देमट्टी, व्ही. पी. सुळगेकर, महेश कोलकार, अनिल कांबळे, दीपक केतकर, अनंत कोलकार, सिद्धराय मेत्री, यल्लाप्पा हुदली आदी कार्यकर्ते उपस्थित होते.