Sun, Aug 25, 2019 03:38



होमपेज › Belgaon › आव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा

आव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा

Published On: Dec 17 2017 1:30AM | Last Updated: Dec 16 2017 11:39PM

बुकमार्क करा





बेळगाव : प्रतिनिधी

जीवनात नेहमी अभ्यासूवृत्ती ठेवा. नव्या युगातील बदलांना सकारात्मकतेने स्वीकारा. त्याचबरोबर कौशल्याच्या जोरावर खडतर आव्हानांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा, असा कानमंत्र भारतीय वायुसेनेचे एअरव्हाईस मार्शल ओ. पी. तिवारी यांनी वायुसेना प्रशिक्षणार्थींना दिला. शनिवारी सकाळी सांबरा येथील वायुसेना प्रशिक्षण केंद्राच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. 

सांबरा येथे वायुसेना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या 2893 प्रशिक्षणार्थींना निरोप देण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला एअरव्हाईस मार्शल ओ. पी. तिवारी यांच्यासह वायुसेना प्रशिक्षण केंद्राचे एअर ऑफिसर कमांडर अरुण भास्कर गुप्ता व उत्तर विभागाचे पोलिस महासंचालक रामचंद्र राव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी गेल्या 6 महिन्यांपासून सांबरा वायुसेना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी एअरव्हाईस मार्शल ओ. पी. तिवारी यांना मानवंदना दिली.

पुढे बोलताना तिवारी यांनी वायुसेना प्रशिक्षणार्थींवर देश रक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आहे. वायूसेनेचे काम करताना सैनिकांनी शिस्त राखावी, देशरक्षण कार्यात कोणत्याही प्रकारे तडजोड करू नका, सर्वोत्कृष्ट कार्यासाठी तत्पर राहा, देशसेवा व देशरक्षणासाठी वचनबद्ध व्हा. आयुष्याची नवी वाटचाल नव्या दमाने सुरू करा. आपल्या कार्यात कसब पणाला लावा, असाही सल्ला त्यांनी दिला. यावेळी ओ. पी. तिवारी यांच्या हस्ते प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या रितककुमार (बेस्ट इन जनरल सर्व्हीस टे्रनिंग), राहुल कुमार साह (बेस्ट इन अकॅडमीक्स्), अंकितकुमार पाल (बेस्ट मार्कमॅन) व हरी शर्मा (बेस्ट ऑलराऊंडर) यांना स्मृतिचिन्ह देण्यात आली.  प्रशिक्षणार्थी वायुसैनिकांनी लयबद्धरित्या पथसंचलन सादर केले. विनयकुमार यांनी प्रशिक्षणार्थींचे नेतृत्व केले. बँडच्या तालावर वायुसैनिकांनी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली. 

या कार्यक्रमाला वायुसेना प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी, कुटुंबीय तसेच प्रशिक्षणार्थींचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.