होमपेज › Belgaon › नाट्य परिषदेला हवा जाणकार सदस्य

नाट्य परिषदेला हवा जाणकार सदस्य

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 7:46PMबेळगाव : प्रतिनिधी

गेली 20 वर्षे नाट्यचळवळीला पुढे नेण्याचे काम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर करीत आले आहे. विविध अडचणींवर मात करून गेल्या 12 वर्षात बेळगाव नाट्यपरिषद शाखेच्या कार्याला विशिष्ट उंचीवर नेले. परिषदेच्या कार्यासाठी अनुभवी सदस्याची गरज आहे.  यामुळे परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुंबई कार्यकारिणीसाठी बेळगाव शाखेचे सदस्य मला पाठिंबा देतील, असा विश्‍वास अ. भा. नाट्यपरिषद कार्यकारिणी सदस्या व बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा  लोकूर यांनी दै. ‘पुढारी’कडे व्यक्त केला. 

दि. 4 मार्च रोजी अ. भा. नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत मुंबई कार्यकारिणीसाठी निवडणूक होत आहे. बेळगाव शाखेच्यावतीने लोकूर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्या म्हणाल्या, 2006 साली बेळगावात शाखेची स्थापना झाली. यानंतर आपल्या अध्यक्षतेखाली वेगवेगळे उपक्रम राबवले. मध्यंतरीच्या काळात चित्रपटसृष्टीतील कामात असल्यामुळे अध्यक्षपदाची धुरा 4 वर्षे अनंत जांगळे यांच्याकडे होती. त्यानंतर 5 वर्षापूर्वी पुन्हा माझी निवड झाली. परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी  कार्यकारिणी सदस्यत्वाचा मान दिला. 
यातूनच अनेक वर्षापासून स्वप्नवत ठरलेल्या बालरंगभूमी अभियानाची निर्मिती झाली. कै. सुलभा देशपांडे, कै. सुधा करमरकर यांचे बालरंगभूमीचे स्वप्न साकारता आले, याचा मला अभिमान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 2015 साली तब्बल 60 वर्षानंतर आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत बेळगावात नाट्यसंमेलन झाले. संमेलनाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना संधी मिळाली. बेळगावात नाटकांसाठी आवश्यक साहित्यासाठी महाराष्ट्र शासन दरबारी पाठपुरावा करून 10 लाखाचे अनुदान मिळविले. नाटकाच्या  नेपथ्यासाठी लागणारे साहित्य उभे केले. 

बालरंगभूमीविषयी विविध उपक्रम राबवून छोट्या मुलांच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत.  लवकरच होणारी निवडणूक ही मुंबईच्या कार्यकारिणीसाठी आहे. बेळगावातून अन्य दोन उमेदवारांनी निवडणुकीत भाग घेतला आहे. त्यांची नाट्यसृष्टीला ओळख नाही. परिषदेचे सदस्य याचा डोळसपणे विचार करतील, असेही त्या म्हणाल्या. नाट्य प्रयोगांचा खर्च वाढला आहे. पुणे, मुंबईपलिकडे मराठी नाटकांचे प्रयोग कमी झाले आहेत. एका प्रयोगासाठी किमान 3 लाख रु. खर्च येतो. यामुळेच बेळगावात मराठी नाटकांचे प्रमाण कमी झाले आहे. जकात रद्द करण्याबाबत कर्नाटक सरकारशी पत्रव्यवहार केला. मात्र त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. बेळगावातील नाट्य चळवळीला उभारी देण्याबरोबरच रंगकर्मींचा सत्कार आणि त्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत.   
- वीणा लोकुर