Thu, Aug 22, 2019 12:27होमपेज › Belgaon › कृषी कर्जमाफी 15 दिवसांत : मुख्यमंत्री कुमारस्वामींची ग्वाही

बळीराजासाठी आनंदवार्ता

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 12:43AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने बळीराजांसाठी आनंदवार्ता देताना कृषी कर्जमाफी करण्याचा  निर्णय 15 दिवसांत घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिली. दोन टप्प्यामध्ये ही कृषी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.पहिल्या टप्प्यात लघु आणि मध्य मुदत कर्जदार शेतकर्‍यांना लाभ मिळेल. त्यामुळे सहकारी संस्थांसह राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्जेही माफ होण्याची शक्यता आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी बैठक झाली. 

पहिल्या टप्प्यामध्ये अल्प व मध्य मुदत कर्जदार शेतकर्‍यांची कृषी कर्जे माफ केली जातील. दुसर्‍या टप्प्यामध्ये शेतकर्‍यांच्या कर्जाचा अभ्यास करून कर्जमाफी जाहीर करण्यात येईल. सहकारी बँकांकडून अल्प व मध्य मुदत शेतकर्‍यांनी घेतलेली कर्जेसुद्धा माफ केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कर्जमाफी योजनेचे नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्हाधिकारी काम पाहतील. कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आपल्या कर्जाची माहिती जिल्हाधिकार्‍यांना सादर केली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आजच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जाचा संपूर्ण अहवाल मागवून घेतला.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेसुद्धा कर्जबाजारी शेतकर्‍यांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी तयार आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफी देवून त्यांच्यासमोरील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे कुमारस्वामी म्हणाले.

बँक कर्जे लवकरच राष्ट्रीयीकृत बँकांच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांबरोबर व त्यांच्या चेअरमनबरोबर कृषिकर्जासंबंधी चर्चा करु. कर्जमाफीची सवलत घेताना शेतकर्‍यांकडून कोणता दुरुपयोग केला जावू नये, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी पुन्हा कर्जासाठी आर्थिक संस्थांशी संपर्क साधावा, असे  मुख्यमंत्री म्हणाले.

दर महिना बैठक

शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरमहिना आपण बैठक घेणार आहे, असे कुमारस्वामी म्हणाले. बुधवारच्या बैठकीला 30 जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी  तसेच उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर, भाजपचे उपनेते गोविंद कार्जोउपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री परमेश्‍वर म्हणाले, कर्जाच्या संदर्भात सरकार कोणतेही राजकारण करत नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी हलाखीचे जीवन जगत असल्याचे सरकारला माहिती आहे. शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सरकार नेहमी पुढे असेल. 

अप्पर कृष्णा प्रोजेक्ट अमलात आणण्याचे काम सरकारने केले तर 150 टीएमसी अतिरिक्त पाणी उत्तर कर्नाटकाला मिळेल. ही योजना शेतकर्‍यांच्या हितासाठी टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.  बैठकीला राज्याच्या मुख्य सचिव के. रत्नप्रभा, अतिरिक्त मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर, डी. व्ही. प्रसाद व एम. लक्ष्मीनारायण उपस्थित होते.