होमपेज › Belgaon › जोल्‍लेंच्या विरोधात तीन माजी आमदार एकत्र

जोल्‍लेंच्या विरोधात तीन माजी आमदार एकत्र

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 08 2018 8:50PMनिपाणी : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षबदलूंचे पेव, कार्यकर्त्यांची कोलांटउडी आणि नेतेमंडळींची पळापळ पाहता निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. 2013 साली झालेल्या निवडणुकीत निपाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहामुळे भाजपचा विजय झाल्याचे बोलले जाते. यंदा मात्र भाजपच्या आ. जोल्‍लेंविरुध्द  काँग्रेस पक्षाचे उमेदवार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील आणि प्रा. सुभाष जोशी हे तिन्ही माजी आमदार एकवट्याने निवडणूक वेगळ्या वळणावर आली आहे.

राष्ट्रीय नेतेमंडळींच्या सभा, महाराष्ट्रातील नेतेमंडळींना सीमाभागात प्रचारातील सहभाग आणि प्रचारफेरी व कॉर्नर सभांना जोर चढल्याने निवडणूक अस्मितेची बनली आहे. गतवेळी विजयी झालेल्या आ. जोल्‍ले विकासकामांच्या नावावर प्रचार करीत विजयाचे आवाहन करीत आहेत. तर विजयाची हॅट्ट्रीक केलेल्या आणि काळम्मावाडी पाणी करारातून सीमाभागातील शेतीला पाणी दिलेले माजी आ. काकासाहेब पाटील विकासकामांच्या जोरावर निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. 

यंदा काकासाहेब पाटील यांना प्रा. जोशींचा पाठिंबा मिळाला असून काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील आणि प्रा. सुभाष जोशी हे तीन माजी आमदार निवडणूक प्रचारात जोल्‍लेंविरुध्द उतरले आहेत. 
निपाणीत राष्ट्रीय नेते शरद पवार, नितीन गडकरी यांच्यासह खा. ज्योतिरादित्य सिंधीया, आ. सतेज पाटील यांच्या सभा झाल्या. 

महाराष्ट्रातील नेतेमंडळींचा सीमाभागात करिष्मा

सीमाभागातील निपाणी आणि चिकोडी-सदलगा मतदारसंघात निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या सभा हमखास असतात. यंदा  राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार, नितीन गडकरी, आ. सतेज पाटील, सुरेश हाळवणकर यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांच्या सभा होत आहेत. आ. सतेज पाटील यांनी तर निपाणी मतदारसंघात रस्त्यावर उतरुन प्रचारयंत्रणा हाती घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेतेमंडळींचा सीमाभागात करिष्मा दिसून येत आहे.प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली असून भाजपसमोर थेट आव्हान उभे केले आहे.त्यामुळे यंदा काकासाहेब की वहिनी अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.