Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Belgaon › मंत्रिमंडळ शपथविधी आठवडाअखेर?

मंत्रिमंडळ शपथविधी आठवडाअखेर?

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 30 2018 12:43AMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस-निजद युती सरकारमध्ये निर्माण झालेला मंत्रिमंडळ स्थापनेचा गोंधळ दूर झाला आहे. आठवडाअखेर मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. नवी दिल्‍ली येथे काँग्रेस वरिष्ठ नेते गुलामनबी आझाद यांच्या निवासस्थानी निजद, काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. प्रमुख खात्यांसाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होती. यावर बैठकीत तोडगा काढण्यात आला असून खातेवाटप करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. आता दोन्ही पक्षांतील इच्छुकांना कोणते खाते द्यावयाचे ते संबंधित पक्षप्रमुख ठरवणार आहेत.

प्रदेश, ज्येष्ठत्व, प्रभाव, जातनिहायसह विविध निकषांवर दोन्ही पक्षांकडून मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थ, सार्वजनिक बांधकाम, महसूल, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, धर्मादाय, पशुसंगोपन खाते निजदला देण्यास काँग्रेसने होकार दिला आहे. त्याचप्रमाणे अबकारी, ऊर्जा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, नगरविकास, खाण आणि भू विज्ञान, उच्च शिक्षण, सहकार खाते काँग्रेसला देण्याबाबत निजदने होकार दिल्याचे समजते.

अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी अमेरिकेला प्रयाण केले. तेथून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवर कर्नाटकातील नेत्यांशी चर्चा केली. खातेवाटपाला त्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. 

निजदमध्ये मंत्रिपदासठी कसरत

मंत्रिपदावरून केवळ काँग्रेसच नव्हे, तर निजदमध्येही रस्सीखेच आहे. मुख्यमंत्रिपद वगळता 11 पदे या पक्षाकडे आहेत. यापैकी एक पद राखीव ठेवावे लागेल आणि आणखी एक पद बसप आमदाराला द्यावे लागणार आहे. उर्वरित 9 पदांवर निवड करावी लागणार आहे. केवळ काहीच ठिकाणी अधिक आणि ज्येष्ठ नेते निवडून आले आहेत. यापैकी सर्वाधिक वक्‍कलिग आहेत. अनेक वर्षानंतर सत्ता मिळाल्याने सर्वांनाच मंत्रीपद हवे आहे.

म्हैसुरातून जी.टी.देवेगौडा, एच. विश्‍वनाथ, हासनमधून एच. डी. रेवण्णा तसेच अनुसूचित जातीतून सहाव्यांदा निवडून आलेले एच. के. कुमारस्वामी, मंड्यातून निवडून आलेले सी. एस. पुट्टराजू, बिदरचे बंडेप्पा काशमपूर यांना मंत्रीपद निश्‍चित आहे.आणखी एक ज्येष्ठ आमदार ए.टी. रामस्वामी यांना विधानसभा उपाध्यक्षपद देण्याचा विचार आहे.

व्यंकटराव नाडगौडा यांना उत्तर कर्नाटक आणि लिंगायत कोट्यातून मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. शिवाय शिवलिंगेगौडा, एस.आर. महेश, डी. सी. तम्मण्णा, सत्यनारायण, श्रीनिवासगौडा, विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी आदी मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.