Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Belgaon › विधानसभेनंतर पुन्हा निवडणुकांचा काळ

विधानसभेनंतर पुन्हा निवडणुकांचा काळ

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 8:49PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी कसरत सुरू आहे. बुधवारी काँग्रेस-निजद युती सरकार अस्तित्वात येत असली आगामी वर्षभराच्या काळात अनेक निवडणुकांची तयारी निवडणूक आयोगाला करावी लागणार आहे. यामध्ये विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुका, विधान परिषद निवडणुकीचा समावेश आहे. बंगळुरातील जयनगर आणि राजराजेश्‍वरीनगर मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कुमारस्वामींनी चन्नपट्टणचे आमदार म्हणून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागेल.

शिमोग्याचे खासदार बी. एस.येडियुराप्पा, बळ्ळारीचे खासदार बी. श्रीरामुलू आणि मंड्याचे खासदार सी. एस. पुट्टराजू यांची विधानसभेवर निवड झाली आहे. विधान परिषद सदस्य भैरती सुरेश, के. एस. ईश्‍वरप्पा, डॉ. जी. परमेश्‍वर आणि व्ही. सोमण्णा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची पदे रिक्‍त आहेत. या पदांसाठी काँग्रेस-निजद एकत्र लढण्याची शक्यता आहे. 
विधान परिषदेवर सरकार नियुक्‍त सदस्य के. बी. शानप्पा, तारा अनुराधा यांचा कार्यकाळ 9 ऑगस्टला संपुष्टात येणार आहे. आणखी एक सदस्य एम. डी. लक्ष्मीनारायण यांनी राजीनामा दिला आहे. या तीन जागांपैकी काँग्रेसला दोन आणि निजदला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारीही आयोगाला करावी लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात 100 पेक्षा अधिक आणि पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात 100 स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपणार आहे. 

काँग्रेस दोन तर निजद एक ठिकाणी

तीन विधानसभा मतदारसंघात होणार्‍या निवडणुकीत काँग्रेस दोन आणि निजद एका ठिकाणी निवडणूक लढवेल, असा अंदाज आहे. जयनगर, राजराजेश्‍वरीनगरात काँग्रेसला निजद पाठिंबा देणार आहे. तर रामनगरात निजदला काँग्रेसचा पाठिंबा असेल.