Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Belgaon › दिव्यांगांना समाजप्रवाहात सामावून घ्या

दिव्यांगांना समाजप्रवाहात सामावून घ्या

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 04 2017 10:44PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

दिव्यांगांनी व्यंगाचे भांडवल न करता विकासासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे. कमतरतेवर मात करून दिव्यांगानी आयुष्य घडवावे व समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, दिव्यांग सबलीकरण विभाग, महिला आणि बालविकास खाते, युवा सबलीकरण व क्रीडा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन करून पालकमंत्री बोलत होते.

ना. जारकीहोळी म्हणाले, दिव्यांगांच्या अंतर्मनात फार मोठी ताकद असते. त्यांनी आपल्या कमतरतेचा बाऊ न करता कर्तृत्व सिद्ध करावे. सरकारने दिव्यांगांना प्रत्येक क्षेत्रात संधी देण्याचे धोरण स्वीकारून आरक्षण दिले आहे. याचा सदुपयोग करून त्यांनी जीवन घडवावे.

जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना सरकारकडून अनेक प्रकारच्या सवलती देण्यात येतात. त्यांच्यामध्ये  मोठी प्रतिभा असते. त्याचा सदुपयोग केल्यास आयुष्यात परिवर्तन घडते. सरकारी सवलती आणि योजनांचा लाभ घेऊन त्यांनी आपले ध्येय गाठावे.

जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन म्हणाले, दिव्यांगांनी कर्तृत्वाने आपल्या आयुष्यात परिवर्तन घडविल्यास आयुष्य सुंदर बनू शकते. याची जाणीव ठेवून कार्यरत राहावे.  आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या दिव्यांग क्रीडापटूंनी मनोगत व्यक्त केले. गरजू दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते तीन चाकी सायकलीचे वितरण करण्यात आले. मनपा आयुक्त शशिधर कुरेर, उपविभागाधिकारी डॉ. कविता योगप्पन्नावर, तहसीलदार मंजुळा नाईक आदी उपस्थित होते. एम. मुनीराज यांनी प्रास्ताविक केले.नामदेव बेलकर यांनी आभार मानले.