Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Belgaon › तक्रारींच्या पाढ्याला आश्‍वासनांचा उतारा

तक्रारींच्या पाढ्याला आश्‍वासनांचा उतारा

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:52PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

चार वर्षे उलटल्यानंतरही बेळगाव महापालिकेतील नगरसेवकांना किरकोळ कामासाठी बैठकांमधून आटापिटा करावा लागतो. याचा प्रत्यय बुधवारी महापालिकेतील महापौर संज्योत बांदेकर यांनी बोलाविलेल्या प्रशासकीय बैठकीत आला. पथदीप, पिण्याचे पाणी, रस्ते गटार आणि ड्रेनेज, हॉकर्सझोन, बगीचा सुधारणा आदी किरकोळ कामांचा पाऊस बैठकीत पडला. दरम्यान, उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी उत्तर विभागासाठी केलेली अग्निशामकदल कार्यालयासाठी जागेची मागणी, नगरसेवक मुज्जमील डोणी यांनी खंजर गल्लीतील गांजा पार्कवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आदी विषय महत्त्वाचे ठरले. 

सकाळच्या सत्रात महापालिकेच्या स्थायी समिती बैठक कक्षात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत प्रभाग क्र. 31 ते 58 दरम्यानच्या उपस्थित सदस्यांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या. महापौर  संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, आयुक्‍त शशिधर कुरेर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत माजी महापौर सरिता पाटील यांनी आपल्या प्रभागातील बसवाण गल्ली येथील ड्रेनेज चेंबर, विहिरींचे दूषित पाणी, मारुती गल्ली येथील जागेवर पडलेले पोल, रस्त्यांवरील खड्डे, रामदेव गल्ली बोळात अर्धा ट्रकभर नारळचा कचरा याबाबत तक्रार मांडली. आयुक्त कुरेर यांनी उघड्यावर कचरा टाकणार्‍या नारळ विक्रेते आणि हॉटेल चालकांवर कारवाईचे आदेश दिले. 

नगरसेविका अनुश्री देशपांडे यांनी प्रभागातील तीन उद्यानांची देखभाल केली जात नाही. सह्याद्रीनगर येथील पाण्याच्या टाकीची समस्या, गॅसलाईनसाठी चांगल्या रस्त्यांवर खोदाई याबाबत तक्रार मांडताना खुल्या जागांवर मनपाने फलक लावावे, अशी सूचना केली. मीनाक्षी चिगरे यांनी आपल्या प्रभागातील नव्या बगीच्यासंदर्भात नव्याने आंदोलनाचा राग आळविला. सूचिता गडगुंजी व बसवराज चिक्कलदिनी यांनी बसवनकोळ येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात असताना या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे, अशी कैफियत मांडली. पुंडलिक परिट यांनी चव्हाट गल्ली येथील रस्त्यावर स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी करताना मराठा मंडळ शाळेेजवळील पाईपलाईनचे काम लांबणीवर पडल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. 

नगरसेविका जयश्री माळगी यांनी प्रभागात अनेक पथदीप बंद असून चोरीच्या घटना वाढत आहेत.  अयोध्यानगरात ड्रेनेज लाईन नसल्याची खंत व्यक्त केली. वैशाली हुलजी यांनी समर्थनगरातील समस्या मांडताना धारवाड रोड पुलाच्या कामादरम्यान नाल्याचे पाणी वळविण्यात आले आहे. त्यातून सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. तानाजी गल्लीतील विहिरींचे पाणी दूषित बनल्याचे सांगितले. 

शांता उप्पार यांनी रेणुकानगर भारत कॉलनी येथील समस्या मांडल्या. लेखास्थायी समिती अध्यक्षा सरला हेरेकर व माया कडोलकर यांनी आपल्या प्रभागात समस्यांचे निवारण झाल्याबद्दल महापौर व अधिकार्‍यांचे आभार व्यक्‍त केले.  आयुक्‍त कुरेर यांनी प्रत्येक नगरसेवकांच्या समस्या ऐकून संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या.