होमपेज › Belgaon › पूरस्थितीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज

पूरस्थितीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 10:19PMजमखंडी : वार्ताहर

महाराष्ट्रातील पश्‍चिम घाटात कृष्णा खोर्‍यात पडत असलेल्या पावसामुळे जमखंडी उपविभागातील मुधोळ, बिळगी, जमखंडी तालुक्यातील कृष्णा, घटप्रभा नद्यांना महापूर येण्याची शक्यता असून त्याचा सामना करण्यास प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती असि. कमिशनर रविंद्र करलिंगवर यांनी दिली.जमखंडीतील मिनी विधानसौधमधील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपविभागातील बिळगी तालुक्यातील 20 गावे, मुधोळ तालुक्यातील 11 गावे व जमखंडी तालुक्यातील 27 गावांना पुराचा धोका संभवतो. त्यात जमखंडी तालुक्यातील जंबगी बी. के., मुत्तूर, कंकणवाडी या गावांना बेटाचे स्वरुप येते तर बिळगी तालुक्यातील एक गाव पूर्ण बाधित होते  तरी येथील नागरिकांचे व जनावरांचे स्थलांतर करण्याकरिता 16 बोटींची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले.
पुराच्या पाण्यातून साप वगैरे आल्यास पकडण्याकरिता त्यातील तज्ज्ञांना तसेच उत्तम जलतरणपटूंना पाचारण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पशूसंगोपन, आरोग्य, परिवहन खात्याकरिता पर्यायी व्यवस्थेकरिता कृती योजना करण्यात आली आहे. पूर परिस्थितीत शुध्द पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जमखंडी तालुक्यात 72 खेड्यातून एकूण 2 लाख 83 हजार 959 जनावरे असून पूरपीडित गावातील जनावरांचे रक्षण करण्याकरिता व त्यांना चारा पुरविण्याची तयारी करण्यात आली आहे. मुत्तूर, कंकणवाडी या गावांना पुराचा धोका अधिक असल्याने खबरदारी घेण्यात येत असून सध्या पाच कुटुंबांचे स्थलांतर देवालयात करण्यात आले आहे व पुराच्या धोक्याचा इशारा नदीकाठच्या गावातून डांगोरा पिटून देण्यात येत असल्याची माहिती दिली.

पुराचा सामना करण्याकरिता 150 लाईफ जॅकेट, 150 बॅटरी, 100 हेल्मेट, 27 वायरलेस सेट, दोरखंड, सेफ्टी हूक पुरविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे. जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरणात गुरुवारी 1 लाख 86 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होती तर 1 लाख 85 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग असल्याचे सांगण्यात आले.जमखंडी तहसीलदार प्रशांत चनगोंड, मुधोळ तहसीलदार बी. जी. महंत, बिळगी तहसीलदार एम. एम. जमखंडी, उपतहसीलदार एस. एस. नायकलमठ, सदाशिव कांबळे, रबकवी बनहट्टी नगर पालिका आयुक्त रमेश कोडगे, अभियंते एस. बी. चौडन्नवर, रविंद्र किरंगी आदी अधिकारी उपस्थित होते.