Sun, Mar 24, 2019 08:32होमपेज › Belgaon › प्रशासन सतर्क, निवडणुकीवर करडी नजर

प्रशासन सतर्क, निवडणुकीवर करडी नजर

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 26 2018 9:10PMबेळगाव : प्रतिनिधी 

गत विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. सीमेवरील चेकपोस्टवर यापूर्वीच्या निवडणुकांत केवळ दोन पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जात असे. यंदा मात्र चेकपोस्टवर मोठी यंत्रणा कार्यरत आहे. शिवाय ग्रामीण भागातील सीआरपीएफ व राज्य पोलिसांचे पथसंचलन करण्यात येत आहे. निवडणूक आचारसंहिता पारदर्शी राबविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी एस. झियाउल्ला  प्रयत्नशील आहेत. 
शहरासह ग्रामीण भागातही भयमुक्त मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांसह राज्य पोलिस खात्याच्या कर्मचार्‍यांकडून खेडोपाड्यातही पथसंचलन करण्यात येत आहे. जिल्ह्यात काही दुर्गम भागात मतदारांवर कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ नये, मतदार दबावाला बळी पडू नये. यासाठी निवडणूक आयोग कसोशीने प्रयत्न करत आहे. मतदानाबाबत जनजागृती करण्याबरोबरच भयमुक्तीसाठी पथसंचलनाचा उपयोग होत आहे. 
सीसीटीव्हीबरोबर व्हिडीओग्राफी 

जिल्ह्यातील सर्वच चेकपोस्ट नाक्यावर यंदा प्रथमच सीसीटीव्ही कार्यरत आहेत. तरीही जिल्हाधिकार्‍यांनी वाहनांचे चित्रीकरण  करण्याचे आदेश दिले आहे. याची अंमलबजावणी सुरू असून प्रत्येक चेकपोस्टवर एका व्हिडीओग्राफरची नियुक्ती करण्यात आली आहे. 

शहरात 11 तर जिल्ह्यात 15 चेकपोस्ट

जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होत आहे. दुचाकीसह चार चाकी वाहने, शासकीय बसेस अशा सर्वच वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. गोवा राज्यातून येणार्‍या चोरट्या दारूवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा पोलिस प्रमुख सी. एच. सुधीरकुमार रेड्डी यांच्या कार्यक्षेत्रात 15 चेकपोस्ट तर पोलिस आयुक्त डी. सी. राजप्पा यांच्या कार्यक्षेत्रातील शहर परिसरात अकरा चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. 

यंदा प्रथमच प्रभावी जनजागृती

जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष जि. पं. सीईओ आर. रामचंद्रन यांनी प्रभावी जनजागृतीची धुरा सांभाळली आहे. आर. रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखील विविध कलापथके, विद्यार्थीपथके व कर्मचार्‍यांकडून मतदानाची गरज आणि महत्त्व याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. 

अकरा विशेष अधिकार्‍यांची नियुक्ती 

राज्यात सर्वाधिक विधानसभा मतदार संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेळगाव जिल्ह्यात 18 मतदार संघ आहेत. या मतदार संघावर बारिक लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने वरिष्ठ आयएएस दर्जाचे अकरा अधिकारी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत. जिल्ह्यातील 18 मतदार संघातील विविध अडचणी सोडविण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. नागरिकांनी थेट संवाद साधण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. 

फ्लाईंग स्कॉडकडून रात्री-अपरात्री पाहणी 

सीमा चेकपोस्ट नाक्यावरील यंत्रणा कोणत्या पद्धतीने कार्यरत आहेत, वाहनांची तपासणी योग्य होते का नाही, नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांकडून रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले आहे की नाह, याची पाहणी करण्याचे काम फ्लाईंग स्कॉडकडून होत आहे. 

Tags : Belagaon, Administration ,alert, elections