बेळगाव : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या तयारीत जिल्हा प्रशासन गर्क झाले आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून कंबर कसून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी खास वेबसाईट तयार केली आहे.
इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे माहिती मिळविणे सुलभ ठरत आहे. यामुळे सोशल मीडियाचा कल्पकतेने वापर करण्यात येत आहे. मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत ऑनलाईन माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी नावाने वेबसाईट तयार केली आहे. यावर इंग्रजी आणि कन्नड भाषेतून माहिती उपलब्ध आहे. यामध्ये मुख्य पान, विधानसभा मतदारसंघ नकाशा (काही मतदारसंघांचे अद्याप उपलब्ध नाहीत), मतदारांची संख्या, प्रमुख वेबसाईट (निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका कार्यालय यांच्या वेबसाईट), मतदारांची संख्या, प्रमुख कार्यालयांचे संपर्क क्रमांक यामध्ये समाविष्ठ केले आहेत.
मतदार नोंदणी, ऑनलाईन नोंदणी, पत्ता बदल, दुरुस्ती आदींबाबत माहिती यामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर नवीन अर्ज करण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. यासाठी अर्ज डाउनलोड करून घेऊन माहिती दाखल करावी लागते.यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शंभर टक्के मतदान, जिल्ह्याचे योगदान असे घोषवाक्य ठरविण्यात आले आहे. यासाठी मतदारात जागृती कार्यक्रम करण्यास प्राधान्य दिले आहे.