Thu, Jan 24, 2019 07:44होमपेज › Belgaon › अभय पाटलांवर कारवाई करावी

अभय पाटलांवर कारवाई करावी

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:25AMबेळगाव : प्रतिनिधी 

विणकर नेते आणि भाजप महानगरचे सचिव पांडुरंग धोत्रेे यांना माजी आ. अभय पाटील यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत विणकरांनी आज पोलिस आयक्‍तालयासमोर काही काळ निदर्शने केली.

रामनाथ मंगल कार्यालयात रविवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार अभय पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते प्रवीण पिळणकर, प्रदीप शेट्टी आदींकडून पांडुरंग धोत्रे यांना मारहाण करण्यात आली, अशी तक्रार टिळकवाडी पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. त्याबाबत सोमवारी विणकरांनी पोलिस आयुक्‍तांना निवेदनही दिले. माजी आ. अभय पाटील यांच्यासह एकूण 35 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, सोमवारी रात्रीपर्यंत कुणावरही अटकेची कारवाई झालेली नव्हती. अजून पुढची प्रक्रिया करायची आहे, अशी माहिती टिळकवाडी पोलिसांनी दिली.

अद्याप कारवाई नाही

पोलिसांकडून अभय पाटील यांच्याविरोधात कोणतीच कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच अशा व्यक्तींची दादागिरी वाढत चालली आहे,असे निवेदनात नमूद केले आहे. यापूर्वीही त्यांच्याकडून शासकीय अधिकारी, वकील यांनाही मारहाण करण्यात आली आहे. आता तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पोलिस आयुक्तांच्या व्याप्तीत असणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात आहे. यावेळी ए. डी. धोत्रे  यशोदा धोत्रे, रेखा चिल्लर, भारती धोत्रे यांच्यासह विणकर उपस्थित होते.

धोत्रेंची प्रकृती स्थिर

रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले पांडुरंग धोत्रे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना रविवारी रात्री केएलईच्या डॉ. कोरे रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या डाव्या बाजुला मानेला जास्त मार लागला आहे. स्कॅनिंग करण्यात येणार आहे.