Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Belgaon › बेळगाव : पोलिसांनी युवकाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला ?

बेळगाव : पोलिसांनी युवकाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला ?

Published On: Dec 03 2017 1:09AM | Last Updated: Dec 03 2017 1:09AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

काकतीजवळच्या सोनट्टी जंगल परिसरात शनिवारी पहाटे अबकारी कारवाईवेळी झालेल्या थरारक पाठलागात विहिरीत पडून अडव्याप्पा सिद्धाप्पा मुचंडी (वय 19) या युवकाचा मृत्यू झाला असून, दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. मात्र, पोलिसांनी युवकाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला, असा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. त्याच रागातून संतप्त ग्रामस्थांनी  अबकारी कार्यालयावर हल्ला करून साहित्याची मोडतोडही केली. 

काकती जंगल परिसरातील अनेक गावांमधून गावठी दारूच्या भट्ट्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. अधूनमधून अबकारी खाते कारवाई करते. शनिवारी पहाटेही अबकारी खात्याने सोनट्टी गावाजवळील परिसरात गावठी दारू भट्ट्यांवर छापे मारून भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. पोलिसांच्या कारवाईमुळे दारूभट्ट्यांवर काम करणार्‍यांनी पळ काढला. पोलिसांनीही त्यांना पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला. त्यामुळे कामगार वाट मिळेल तिकडे पळत होते. पळताना सोनट्टी गावचा अडव्याप्पा हा युवक शेतातील विहिरीत पडून बुडाला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग थांबवला. 

अडव्याप्पा विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांना कळताच त्यांनी अबकारी पथकावर दगडफेक सुरू केली. पोलिस कारवाईदरम्यान अडव्याप्पा ठार झाल्याची माहिती मिळताच सोनट्टी गावातील संतप्त गावकर्‍यांनी पोलिसांवर चाल केली.पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काकती डोंगरावरील वातावरण तणावग्रस्त झाले. संतप्त गावकर्‍यांनी पोलिसी वाहनांची तोडफोड केली. 

पोलिस-गावकर्‍यांत खडाजंगी

काकती जंगलात सुरू असलेल्या थराराची माहिती मिळताच काकती ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश गोकाक अतिरिक्त फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकर्‍यांना संयम राखण्याचे आवाहन केले. मात्र, गावकरी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. पोलिस आणि गावकर्‍यांत जोरदार खडाजंगी उडाली. बकारी पोलिसांनीच अडव्याप्पाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला. तसेच अडव्याप्पाचा मृतदेह घटनास्थळाहून हलविण्यास विरोध केला. पोलिस निरीक्षक गोकाक यांनी कारवाईची चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा शवागारात पाठविण्यात आला. सायंकाळी उशिरा शवचिकित्सेनंतर अडव्याप्पाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत काकती आणि आसपासच्या जंगल परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे या भागात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

2009 ची आठवण

2009 मध्येही मुत्त्यानट्टीच्या जंगलात अबकारी पोलिसांनी अबकारी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दारूभट्ट्या उद्ध्व्स्त करण्याची मोहीम राबवली होती. त्यावेळीही ग्रामस्थांच्या हल्ल्यात पोलिस जखमी झाले होते.

अबकारी कार्यालयावर हल्ला; 2 कर्मचारी जखमी

अडव्याप्पाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या सोनट्टी ग्रामस्थांनी पोलिस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या शहर अबकारी कार्यालयावर हल्ला केला. तसेच दोन कर्मचार्‍यांना मारहाण केली. 

अडव्याप्पाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात उत्तरीय तपासणीसाठी आणला गेल्यानंतर बेळगावात दाखल झालेल्या ग्रामस्थांनी आपला मोर्चा अबकारी कार्यालयाकडे वळवून कार्यालयासमोर असलेल्या जीपच्या काचा फोडल्या, तसेच कार्यालयातील टेबल, खुर्च्यांची मोडतोड केली, तसेच काचा फोडल्या. 

जमावाच्या हल्ल्यात एकनाथ गावडे, ए. डी. जाधव हे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर जखमा झाल्या असून, कार्यालयातील फरशीवर रक्ताचे डाग पडले होते. दोन्ही कर्मचार्‍यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी जाऊ देण्यात आले. हल्ल्यानंतर अबकारी पोलिसांनी ग्रामस्थांच्या विरोधात मार्केट पोलिसांत तक्रार दिली आहे, अशी माहिती अबकारी आयुक्त अरुणकुमार यांनी दै.‘पुढारी’ला दिली, तर अबकारी अधिकारी पोलिस ठाण्यात आले होते, त्यांनी चर्चा केली, मात्र अजून आम्ही एफआयआर नोंदवलेला नाही, अशी माहिती मार्केट पोलिसांनी दिली. एफआयर रात्री उशिरा नोंदवला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.