Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Belgaon › महिलेचा अपघाती मृत्यू

महिलेचा अपघाती मृत्यू

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 11:42PMबेळगाव: प्रतिनिधी    

आपल्या वाग्दत्त सुनेचा शालू खरेदी करण्यासाठी निघालेल्या महिलेचा बुधवारी सायंकाळी जुना पीबी रस्त्यावरील रुपाली थिएटरजवळ अपघाती मृत्यू झाला. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली असून, त्यात महिलेचा पती जखमी आहे.सुजाता बसवराज कारगी (वय 45, रा. देवांगनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे पती बसवराज किरकोळ जखमी आहेत. 

देवांगनगरच्या बसवराज व सुजाता यांच्या मुलाचा  विवाह 4 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होता.  त्यासाठी हे दांपत्य सायंकाळी शालु आणण्यासाठी दुचाकीवरुन बाजाराला निघाले. मात्र जुन्या पीबी रस्त्यावर हिंद इंजिनिअरिंगजवळच्या नाल्याजवळ दुचाकी वळवत असताना कारगी यांच्या दुचाकीला मागून येणार्‍या ट्रकने धडक दिली. त्याबरोबर बसवराज रस्त्याच्या डावीकडे पडले, तर सुजाता रस्त्यावरच पडल्या आणि मागून येणार्‍या ट्रकखाली सापडल्या.  अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले.

घटनास्थळी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा  करून मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागाराकडे पाठवला, बसवराज यांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विवाह सोहळ्याच्या तयारीत असलेल्या कारगी कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. देवांगनगरात अपघाताची माहिती कळल्यानंतर जिल्हा रुग्णालय आणी शवागाराकडे नागरिकांनी गर्दी केली.सायंकाळी उशिरा  शवचिकीत्सा करुन मृतदेह संबंधीतांच्या ताब्यात देण्यात आला.