Fri, Aug 23, 2019 14:26होमपेज › Belgaon › बेळगांव पोलिसांच्या मोटारीला भीषण अपघात : चालकाचा मृत्यू

बेळगांव पोलिसांच्या मोटारीला भीषण अपघात : चालकाचा मृत्यू

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 11:19PMकोल्हापूर : कागल : प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यात मुंबईतील एका संशयितास ताब्यात घेवून बेळगांवकडे परतणार्‍या पोलिस पथकाच्या मोटारीला कागलजवळ झालेल्या भीषण अपघातात खासगी मोटार चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एपीएमसी सहाय्यक  पोलिस  निरीक्षकासह तीन पोलिस गंभीर जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री दीडवाजता ही घटना घडली. जखमींना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजू आण्णाप्पा चिकूगोळ (वय 27,रा.अंकलगी,ता.गोकाक) असे मृताचे नाव आहे. अशीर अहमंद जमादार (रा. सुभाषनगर, बेळगांव), रावसाहेब आण्णाप्पा कणकरेड्डी (रा. रामतीर्थनगर, बेळगाव), विश्‍वनाथ बळवंत माळगे (रा. अशोकनगर, बेळगांव) हे पोलिस जखमी झाले. संशयित नूरमहमंद गुलाम शेख (रा.अंधेरी वेस्ट, मुंबई) यालाही किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुणे-बंगळूर चौपदरी महामार्गावर घटना घडली.

बेळगांव येथील चोरीच्या गुन्ह्यात मुंबईतील नूरमहमंद शेख याचे नाव निष्पन्न झाल्याने मार्केट यार्डचे पथक मुंबईला रवाना झाले होते. शासकीय वाहनाऐवजी राजू चिकुगोळ याची इनोव्हा कार भाड्याने घेतली होती. संशयित शेखला शुक्रवारी (दि.26) पहाटे अंधेरी वेस्ट येथून ताब्यात घेतले.दुपारी पथक बेळगावकडे निघाले. मध्यरात्री दीडला  कागल येथे आले. भरधाव मोटारीने मुरगूड नाक्यासमोरील रस्त्यावर मध्यवर्ती डिव्हायडरला जोरात धडकली. डिव्हायडरमधील लोखंडी आडथळ्यात घुसली.आडथळ्याचे लोखंडी बार मोटार चालकाच्या डोक्यात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तर शेजारी बसलेल्या पोलिसांच्या शरिरात बार घुसले. त्यात तिघेही पोलिस गंभीर जखमी झाले.  

घटनेची माहिती मिळताच कागल पोलिस ठाण्यातील फौजदार श्रीगणेश कवतिके,तळपांडे,पी.पी.पांडे घटनास्थळी दाखल झाले.जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली.

पोलिसाच्या उपचारासाठी संशयिताची धडपड

अपघातात चालकासह तीनही पोलिस गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास येताच चोरीप्रकरणी ताब्यातील नूरमहमंद शेखने रस्त्यावरील वाहनधारकांकडे मदतीसाठी याचना केली. पण काहीकाळ प्रतिसाद मिळाला नाही. परिसरातील काही तरूण धावत आले. त्यांच्यामदतीने 108 क्रमाकांवर कॉल करून रुग्णवाहिका बोलावून घेण्यात आली. गंभीर अवस्थेतील तीनही पोलिसांना त्याने रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला हलविले.पोलिसावरील उपचारासाठी त्याची धडपड लक्षवेधी ठरली.