होमपेज › Belgaon › थोडा है, बहुत की जरुरत है...!

थोडा है, बहुत की जरुरत है...!

Published On: Jul 06 2018 1:31AM | Last Updated: Jul 05 2018 7:54PMबेळगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकारने भात, नाचणा, भुईमुगासह सोयाबीन, मका अशा 14 पिकांना वाढीव हमीभाव जाहीर केला. उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हा भाव कमी असून, तो अजून वाढावा, किमान अडीचपट केला जावा, असा सूर शेतकर्‍यांतून  व्यक्त होत आहे. सरकारने गृहित धरलेला उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षातील उत्पादन खर्च यामध्ये फरक असून, प्रत्यक्ष उत्पादन खर्च अधिक असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

उत्पादन खर्च आधारित पीक दर जाहीर करण्याची मागणी देशभरातील शेतकरी संघटनांनी  अनेक वर्षापासून लावून धरली होती. त्यामुळे केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केला आहे. पण तो कमी असल्याचा दावा करून त्याची कारणेही शेतकऱी देत आहेत. 

बियाणापासून रासायनिक खते, मजूरीचे दर वाढले आहेत. उत्पादन खर्च निश्‍चित करताना सरकारने शेत जमिनीची गुंतवणूक आणि शेतकर्‍यांचे कष्ट यामध्ये समाविष्ट केलेले नाहीत, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. भारतीय शेती हा मान्सूनचा जुगार मानला जातो. भारतीय शेतकरी बेभरवशी  वातावरणावर अवलंबून शेती करतो. त्यातच अलिकडच्या काळात परंपरागत बियाणे कालबाह्य ठरली आहेत. यामुळे संकरीत बियांणाचा वापर केला जातो. यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. मशागतीचा खर्च भरमसाठ आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.