Wed, Feb 20, 2019 03:19होमपेज › Belgaon › समितीच्या एकीसाठी आज ‘आत्मक्‍लेश’

समितीच्या एकीसाठी आज ‘आत्मक्‍लेश’

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:38AMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीच्या दोन गटांत एकी व्हावी, यासाठी सुरेश हुंदरे स्मृतिमंचतर्फे रविवारी सकाळी 11 ते 5 या कालावधीत छत्रपती शिवाजी उद्यानात आत्मक्‍लेश आंदोलनांतर्गत उपोषण करण्यात येणार आहे. सीमाभागातील मराठी भाषिक वकील, डॉक्टर, उद्योगपती, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती मंचचे प्रवक्‍ते राजेंद्र मुतकेकर यांनी दिली.सुरेश हुंदरे स्मृतिमंचच्या वतीने  म. ए. समितीच्या एकीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत मराठी उमेदवार अधिक संख्येने निवडून येण्यासाठी एकी आवश्यक आहे.

मात्र एका गटाने सातत्याने सहकार्य करण्यास टाळाटाळ चालविली आहे. यामुळे शहर म. ए.समितीने शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर मुक्‍कमी प्रा. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत म. ए. समितीचे खचिनदार प्रकाश मरगाळे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मराठी उमेदवार एकमेकासमोर उभे ठाकून मराठी मतांचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी स्मृतिमंचतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्यामुळे उपोषण करण्यात येणार आहे.

उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी 11 वा. होणार आहे. यामध्ये एकीची मागणी करणारे सीमाभागातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर मराठी लोकप्रतिनिधींनीही सहभागी व्हावे असे आवाहन स्मृतिमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. राम आपटे व पदाधिकार्‍यांनी केले आहे. खानापूर आणि शहर म. ए. समितीमध्ये फूट असून तालुका म. ए. समितीच्या दोन्ही गटात एकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. दोन्ही गटांनी एकत्र यावे. चर्चेतून उमेदवार निश्‍चित करावा, अशी भूमिका स्मृतिमंचच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

Tags : Belgaum, Aathmkalesh,  Unity