Sun, Oct 20, 2019 01:08होमपेज › Belgaon › खत खरेदीसाठीही आधारकार्ड सक्ती 

खत खरेदीसाठीही आधारकार्ड सक्ती 

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 8:25PMखानापूर : प्रतिनिधी

सरकारकडून मिळणार्‍या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी खताचा अवैध साठा करुन त्याची काळाबाजारात विक्री होेऊ नये. यासाठी खत खरेदी करताना शेतकर्‍यांना आधारकार्डची सक्ती करण्यात आली असल्याची माहिती खानापूरचे सहाय्यक कृषी उपसंचालक डी. बी. चव्हाण यांनी दिली.

मान्सूनची चाहूल लागल्याने खतविक्री केंद्रांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र येथून पुढे आधारकार्डविना खत खरेदी करता येणार नाही. कोणत्याही सरकारी अथवा खासगी खत विक्री केंद्रातून खत खरेदी करताना शेतकर्‍याला आपल्या आधारकार्डचे झेरॉक्स सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच खत विक्रेत्यांना पीओएस (पॉईंट ऑफ स्टॉक) मशीनचे वितरण करण्यात आले असून शेतकर्‍याच्या अंगठ्याचे निशाण घेऊन डिजिटल प्रणालीद्वारे खत वितरणावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

बियाणे, खत आणि औषध विक्रेत्यांसाठी आयोजित बैठकीत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, दोन वर्षापासून पडत असणार्‍या दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत खत व बियाणांचा वेळेत व योग्य दरात पुरवठा करणे हे केवळ कृषीविभागाचेच नव्हे तर विक्रेत्यांचेही सामाजिक कर्तव्य आहे. शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही, याची पुरेशी दक्षता विक्रेत्यांनी घ्यावी. खताचे दर स्थिर नाहीत. पेट्रोलसारखे खताचे दरही सरकारकडून दिल्या जाणार्‍या सबसिडीवर अवलंबून असतात. त्यामुळे खतांचे दर रोज बदलत असल्याने त्याचे रोजचे दरपत्रक दुकानाबाहेर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दर शनिवारी दुकानातील बियाणे, खत व औषधांच्या शिल्लक साठ्याबाबत कृषीविभागाला माहिती देणे आवश्यक आहे.

तालुक्यात 80 पेक्षा अधिक खत विक्रीकेंद्रे असून त्यापैकी 40 केंद्रे कार्यरत आहेत. यावर्षी कृषी विभागाने 44 हजार 250 हेक्टर भातलागवड क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवून बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. पॉस मशीनची यंत्रणा आधारशी जोडली गेलेली असल्यामुळे खताची खरेदी नेमकी शेतकर्‍यानेच केली आहे की नाही, हे समजणार आहे. परिणामी खतवितरण प्रक्रियेत मोठी पारदर्शकता येणार आहे. बियाणे व खतांचे कृषी विभागाने काटेकोर नियोजन केले आहे. तरीही तक्रारी असल्यास कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.खतविक्रेत्यांना डिजिटल मशीनचे वितरण करण्यात आल्याने शेतकर्‍यांना पावती बिले देणे सक्तीचे करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी न विसरता विक्रेत्याकडून पावती बिलाची मागणी करावी. त्यासाठी आधारकार्ड झेरॉक्स सादर करुन बिलाची पावती घ्यावी. जे विक्रेते या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही कृषी अधिकार्‍यांनी दिला आहे.

पावती बिल देणे, दरपत्रक लावणे सक्तीचे

खताचे दर स्थिर नसल्याने शेतकर्‍यांना त्याची योग्य माहिती मिळावी, यासाठी दुकानाबाहेर ठळक अक्षरात रोजच्या खताचे दर तसेच उपलब्ध असलेला साठा यांची माहिती लावण्यात यावी. छापील किंमतीपेक्षा जादा बिलाची आकारणी केली जाऊ नये. यासाठी पावती बिलाची सक्ती विक्रेत्यांना करण्यात आली आहे.