Sat, Jun 06, 2020 10:14होमपेज › Belgaon › तिकीट आरक्षणासाठी ‘एटीव्हीएम अ‍ॅप’

तिकीट आरक्षणासाठी ‘एटीव्हीएम अ‍ॅप’

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 10:25PMबेळगाव : प्रतिनिधी    

रेल्वे मंत्रालयाने नुकत्याच सुरू केलेल्या रेल्वे तिकीट आरक्षणाच्या युटीएस अर्थात कसे करावे मोबाईलवरून तिकीट बुकिंग याचा प्रारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत बेळगाव येथे याची सुरुवात झाली. प्रवाशांना आता ‘एटीव्हीएम’ अ‍ॅप उपलब्ध आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत यापुढे रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी रांगेत थांबावे लागणार नाही. आपल्या मोबाईलच्या अ‍ॅपद्वारे त्यांना आगाऊ तिकीट आरक्षण करता येणार आहे. यासाठी अतिरिक्त शुल्कही भरता येणार नाही. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी तिकिटाबरोबरच प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग करण्यासाठी विशेष अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. ‘एटीव्हीएम’ असे हे अ‍ॅप असून आपल्या मोबाईल क्रमांकावरून या अ‍ॅपवर संपर्क साधून आपण कोठून कोठे जाणार आणि आवश्यक असलेल्या स्थळाचे नामनिर्देश केल्यानंतर तिकीट उपलब्ध होणार आहे. यासाठी त्यांना आपला मोबाईल क्रमांक, बँकेच्या खात्याचा नंबर आणि आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. 

तिकीट उपलब्ध नसल्यास त्यांच्या खात्यामधून रक्कम घेतली जाणार नाही. उलट त्यांना अन्य पर्यायी मार्ग सुचविण्यात येणार आहेत.  संबंधित प्रवाशाला पर्यायी मार्गाने जावयाचे असल्याचे त्याला या अ‍ॅपच्या माध्यमातून मागणी करता येणार आहे. 

देशभरातील बर्‍याचशा स्थानकांवर रेल्वे तिकीट मिळविण्यासाठी व आरक्षण करण्यासाठी प्रचंड गर्दी होते. ही गर्दी दूर करण्याबरोबरच रेल्वे प्रवास सुलभ व्हावा, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवासी ज्यावेळी एटीव्हीएमच्या माध्यमातून तिकीट बुक करेल त्यावेळी त्याच्या मोबाईल क्रमांकावर तिकीट बुक झाले आहे की नाही, याचा संदेशही उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना यासंदर्भात माहिती उपलब्ध होत नसेल तर त्यांनी रेल्वे स्थानक मुख्य अधीक्षकांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधीक्षकांशी संपर्क करण्याचे आवाहन 

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सेवेसाठी एटीव्हीएम अर्थात मोबाईलवरून तिकीट बुक करण्यासाठी अ‍ॅप उपलब्ध केला आहे. याद्वारे प्रवाशांना घरबसल्या तिकीट उपलब्ध होणार आहे. यासाठी केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी रेल्वे स्थानकावरील मुख्य अधीक्षकांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.