Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Belgaon › स्मार्ट सिटी अभियंत्यावर एसीबी छापे

स्मार्ट सिटी अभियंत्यावर एसीबी छापे

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

महानगरपालिकेचे  सहायक कार्यकारी अभियंता व स्मार्ट सिटी योजनेचे प्रभारी अभियंता किरण सुब्बाराव भट्ट यांच्यावर  मंगळवारी भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) कारवाई करताना एकाच वेळी पाच ठिकाणी छापे घातले. त्यांच्याकडून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मात्र, अधिक माहिती देण्यास एसीबीने नकार दिला.

मंगळवारी पहाटेच सुब्बाराव यांचे टिळकवाडीतील स्मार्ट सिटी कार्यालय आणि राणी चन्‍नम्मा नगर येथील निवासस्थान, तसेच गोडसेवाडीतील मालमत्तेवर एकाचवेळी छापे घालण्यात आले. तर त्यांचे जन्मगाव सिद्धापूर आणि बंगळूर येथेही स्थानिक एसीबी अधिकार्‍यांनी छापे घातले. 

पहाटे 6 वाजता कारवाईला सुरुवात झाली. सुब्बाराव यांनी आपल्या उत्पन्‍नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा संशय एसीबीला आहे. त्यानुसार मालमत्तांची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. बेळगाव एसीबीचे एसपी अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत सुब्बराव यांच्या निवासस्थानांसह मालमत्तांच्या ठिकाणी  एसीबीचे अधिकारी ठाण मांडून होते. सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांची छाननी करून तपशील घेण्याचे काम सुरू होते. मालमत्तेसंदर्भातील अधिकृत आकडा तूर्त सांगणे अशक्य असल्याचे एसीबी पथकातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. एसीबीच्या कारवाईत पोलिस उपाधीक्षक जे. रघु, निरीक्षक विश्‍वनाथ कब्बुरी, वाय. एस. धरनायक यांच्यासह 12 जणांचा समावेश होता.